जगभरात सध्या ओमायक्राॅन या कोरोनाच्या विषाणूमुळे चिंता वाढली आहे. आतापर्यंत अनेक देशांत या नव्या विषाणूने आपले हात-पाय पसारले आहेत. आता याच कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन प्रकारातून पहिला मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा पहिला मृत्यू झाल्याचे स्वत: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी सांगितले आहे. ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांत ओमायक्रॉनच्या 663 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर इस्रायलमध्ये बाधितांची संख्या 57 टक्क्यांनी वाढली आहे. ब्रिटनमध्ये,ओमायक्रॉन प्रकाराने संक्रमित लोकांची संख्या 1 हजार 898 झाली आहे, तर इस्रायलमध्ये संक्रमितांची संख्या 35 वरून 55 पर्यंत वाढली आहे. भारतात या प्रकाराचे 41 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 20 रुग्ण आहेत.
बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता
ब्रिटनमधील संसर्गाचा सध्याचा दर असाच कायम राहिल्यास महिन्याच्या अखेरीस ओमायक्रॉनची लागण झालेल्या लोकांची संख्या दहा लाखांपर्यंत वाढू शकते, असा ब्रिटिश आरोग्य तज्ज्ञांचा अंदाज आहे. कोविड संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी अर्ध्याहून अधिक रुग्णांना ओमायक्रॉन प्रकाराने संसर्ग होण्याची शक्यता आहे.
परदेशातून परतलेले लोकं संक्रमित
इस्रायली सरकारच्या म्हणण्यानुसार, देशात आढळलेल्या एकूण ओमायक्रॉन संक्रमितांपैकी बहुतेक परदेशी प्रवासातून परतलेले आहेत. एकूण 55 संक्रमितांपैकी 36 दक्षिण आफ्रिका, यूके, फ्रान्स, यूएस, यूएई, बेलारूस, हंगेरी, इटली किंवा नामिबियाच्या प्रवासातून परतले आहेत.
महाराष्ट्रात ओमायक्रॉनबाधितांची संख्या २० वर
सोमवारी लातूर आणि पुण्यात ओमायक्रॉनचा प्रत्येकी एक रुग्ण आढळल्यामुळे आता राज्यात ओमायक्रॉनबाधितांची संख्या 20वर गेली आहे. मुंबई-5, पिंपरी-चिंचवड-10, पुणे-2, कल्याण-डोंबिवली-1, नागपूर -1 आणि लातूर -1 असे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. सोमवारी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी 2 रुग्ण ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. यापैकी एक रुग्ण पुणे येथील आणि एक रुग्ण लातूर येथील आहे. हे दोन्ही रुग्ण लक्षणेविरहित आहेत. त्यापैकी पुण्यात आढळलेला रुग्ण 39 वर्षांची महिला असून लातूरमधील रुग्ण 33 वर्षीय पुरुष आहे. हे दोन्ही रुग्ण दुबईहून राज्यात आलेले आहेत. दोघांनीही लसीचे दोन डोस घेतलेले आहेत.
( हेही वाचा: उद्यापासूनच मुंबईतील शाळांची घंटा वाजणार! )