मुंबईतील शाळा दिवाळीनंतर सुरळीतपणे सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, दीड वर्षांच्या कालावधीनंतर शाळेच्या दिशेने येणाऱ्या मुलांना आणि पालकांना ‘सेफ झोन’ भुरळ पाडणार आहे. बालकांना चालण्याजोगे झोन मुंबईत तयार करण्यात येत असून, याचा पहिला सेफ स्कूल झोन हा भायखळा येथील मिर्झा गालिब मार्गावर बनवण्यात आला आहे.
प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पात राबवण्यात येणार
मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलिस यांनी वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय), इंडिया रॉस सेंटर यांच्या माध्यमातून भायखळा येथील मिर्झा गालिब मार्गावर शहरातील पहिला सेफ स्कूल झोन प्रायोगिक तत्वावर सुरू केला. हा प्रकल्प ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी यांच्यातर्फे हाती घेण्यात आला आहे. मुंबईत बालक-स्नेही आणि चालण्याजोगे स्कूल झोन तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. रस्ता वापरकर्त्यांसाठी, विशेषतः मुलांसाठी रस्ते चालण्याजोगे, विनाअडथळा, सुरक्षित आणि अधिक चैतन्यमय करणारी डिझाइन सोल्यूशन्स या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पात राबवण्यात येणार आहेत.
(हेही वाचा : प्रकल्पबाधित कुटुंबाला घरांऐवजी मिळणार ५० लाखांपर्यंतची रक्कम)
खेळण्यासाठी बालकस्नेही घटकांचा अंतर्भाव करणार
मुंबई वाहतूक पोलिस, मुंबई महानगरपालिका, तज्ज्ञ आणि स्थानिक रहिवासी एकत्र आले आणि त्यांनी रंग, बॅरिकेड्स आणि कोन्सचा प्रायोगिक तत्वावर वापर केला. डिझाइन सोल्यूशनमध्ये माहिती फलकांचा वापर करून स्कूल झोन्सची आखणी करणे, रस्त्यांवर खुणा करणे, चालण्यासाठी वाट पाहण्यासाठी निश्चित भाग नियुक्त करणे, पिक-अप झोन, ड्रॉप झोन यासह मल्टी-युटिलिटी (बहु-उपयुक्तता) झोन्स निश्चित करणे, खेळण्यासाठी बालकस्नेही घटकांचा अंतर्भाव करणे आणि पादचाऱ्यांसाठी ठळक क्रॉसिंग आखणे याचा समावेश आहे. कमी खर्चाच्या साहित्याचा वापर करून केलेल्या या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पाविषयी या परिसरातील नागरिकांकडून प्रतिक्रिया घेण्यात येतील आणि त्यानंतरच हे बदल कायमस्वरुपी करण्यात येतील.
मुंबईत शाळा जवळ मात्र रस्ते चालण्याच्या दृष्टीने सुरक्षित नाही
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि शाळेतील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतानाच, शाळेत जाण्याचा मार्गही सुरक्षित असावा, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुंबईत शाळा चालत जाण्याच्या अंतरावर असली तरी हे रस्ते चालण्याच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याने अनेक पालक त्यांच्या वाहनांनी मुलांना शाळेत पोहोचवतात. मुलांसाठी रस्ते सुरक्षित केल्याने रस्ते वापरणाऱ्या सर्वांसाठीच ते सुरक्षित कसे होतील, हे या प्रयोगातून दिसून येईल, असे समाजवादी पक्षाचे स्थानिक नगरसेवक रईस शेख यांनी सांगितले. ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीजच्या केली लार्सन म्हणाल्या, “शहरातील रहिवाशांची रहदारी आणि सुरक्षितता वाढविण्यात रस्त्यांची रचना कारसाठी न करता लोकांसाठी करण्याची महत्त्वाची भूमिका असते. बृहन्मुंबई महानगरपालिकेशी भागीदारी करताना आम्हाला अभिमान वाटत असल्याचे सांगितले. याप्रसंगी ई वॉर्डचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजु, पोलिस निरीक्षक (वाहतूक) के एस करे, डब्ल्यूआरआय इंडियाच्या सस्टेनेबल सिटीज आणि ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापक रोहित टाक आदी उपस्थित होते.
दोन वर्षांत २३ अपघात
ई वॉर्डमधील (भायखळा) मिर्झा गालिब मार्गावर ख्राइस्ट चर्च स्कूल आणि सेंट अॅग्नेस हाय स्कूल या दोन शाळा आहेत. २०१७ ते २०१९ या तीन वर्षांच्या काळात ख्राइस्ट चर्चच्या परिसरातील ५०० मीटरच्या परीघात २३ अपघात झाले आणि ३ मृत्यू झाले. यात दोन मुलांचाही समावेश होता. घरी परत जाताना झालेल्या अपघातात त्यांना गंभीर इजा झाली होती आणि एका मुलाचा मृत्यू झाला होता. तसेच, २०१७ ते २०१९ या काळात मुंबईतील एकूण २,६१० शाळांपैकी २८% शाळांच्या ५०० मीटरच्या परिघामध्ये तीनहून अधिक अपघाती मृत्यू झाले आहेत.
Join Our WhatsApp Community