स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पहिला व्हर्च्युअल रिअॅलिटी चित्रपट येणार; योगेश सोमण यांचे लेखन, दिग्दर्शन

112

मुक चित्रपटापासून सुरू झालेला सिनेमाचा प्रवास कृष्णधवल, रंगीत ७० mm असा करत थ्री डी आणि ८ डी पर्यंत पोहोचला आहे. तसेच दूरचित्रवाणीसह संपूर्ण मनोरंजन विश्व सातत्याने होत असलेल्या संशोधनामुळे बदलत गेले आहे.  मोबाईलच्या जमान्यात तर चित्रपट पाहण्यासाठी गेम्स खेळण्यासाठी तळहाता एवढ्या डिस्प्लेचा आपण वापर करत आहोत. तंत्रज्ञान अतिशय पुढे जात असताना आपण सध्या व्हर्च्युअल रिअॅलिटी ( VR) तंत्रज्ञानापर्यंत पोहोचलो आहोत. आता याच तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिल्या चित्रपटाची निर्मिती पुणेकर करत असून हा चित्रपट स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचा ऐतिहासिक चरित्रपट असणार आहे, अशी माहिती सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संचालक संतोष रासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार 

या प्रसंगी प्रसिद्ध अभिनेते आणि या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण, रिलाइन्स अॅनिमेशनचे सीईओ तेजोनिधी भंडारे, सृजन विद्याव्रतचे उपाध्यक्ष अमित नाडकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना संतोष रासकर म्हणाले, मनोरंजनाच्या क्षेत्रात आज आमूलाग्र बदल झाला आहे. सध्याच्या काळात  व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि मेटावर्स ही शब्द आपण ऐकतो आहोत. वास्तवाचा आभास निर्माण करू शकणाऱ्या व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्रज्ञानाच्या मदतीने जगात काही चित्रपट निर्माण करण्यात आले आहेत. VR तंत्रज्ञानावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या हेडसेट बॉक्सची गरज असते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जगाला ओळख करून देताना आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. सृजन निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन  योगेश सोमण करणार आहेत.

(हेही वाचा उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, तेव्हाच आम्ही कायदेशीर लढाई जिंकली; शिवसेना आमदाराचे सूचक विधान)

चित्रपटासाठीचा खर्च क्राउड फंडिंगद्वारे जमा करणार  

लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण म्हणाले, सावरकर यांच्या जीवनावरील या ४५ मिनिटांच्या व्हर्चुअल रिअल चित्रपटात वीर सावरकर यांना दोन जन्मठेपांची शिक्षा झाली होती, त्यापैकी १९११ ते १९२१ या काळात सावरकर पोर्ट ब्लेअर वरील सेल्युलर जेल येथे बंदीवासात होते. सेल्युलर जेलमध्ये सावरकर बंधूंनी अनन्वित अत्याचार सहन केले, त्याशिवाय सावरकरांनी राजबद्यांची क्रांतिकारकांची संघटना बांधली, साक्षरतेचा प्रसार केला, हिंदू शुद्धीकरणाची मोहीम राबवली,  इतकेच नाही तर पहिल्या महायुद्धाच्या काळात युरोपातील अभिनव भारतच्या क्रांतिकारकांनी सावरकरांची मुक्तता करण्यासाठी एमडेन नावाची युद्ध नौका धाडली होती. त्या सुमारास सावरकरांनी मार्सेलीस सारखा निसटण्याचा प्रयत्न केला असेल का ? हे सगळे चित्रण आमच्या या ४५ मिनिटांच्या चित्रपटात बघायला मिळेल. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मोठा खर्च असून त्यासाठी एका ट्रस्टच्या माध्यमातून  क्राउड फंडिंग (निधी) उभारण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.