WHO आणि आयुष मंत्रालयातर्फे पारंपरिक औषधांवरील पहिल्या जागतिक शिखर परिषदेचे आयोजन

176

आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे पारंपरिक औषधांवर पहिलीच जागतिक परिषद 17 आणि 18 ऑगस्ट 2023 रोजी गुजरातमधल्या गांधीनगर येथे होणार आहे. या शिखर परिषदेमध्ये, देशाचा या क्षेत्रातील विपुल अनुभव आणि कौशल्ये विचारात घेतले जातील. तसेच हा बहुप्रतिक्षित कार्यक्रम तज्ज्ञ आणि अभ्यासकांसाठी या क्षेत्रातील नवीनतम वैज्ञानिक प्रगती आणि पुराव्यावर आधारित ज्ञानाचा शोध घेण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल आणि याचे अंतिम ध्येय सर्वांसाठी आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करणे हेच असेल.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसस हे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. जी 20 सदस्य राष्ट्रांचे आरोग्य मंत्री, जागतिक आरोग्य संघटनेचे WHO प्रादेशिक संचालक आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहा क्षेत्रांतील देशांमधील प्रतिष्ठित निमंत्रितांसह या कार्यक्रमाला शास्त्रज्ञ, पारंपरिक औषधांचे अभ्यासक, आरोग्य कर्मचारी आणि नागरी समाजिक संस्थांचे सदस्य उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. या परिषदेविषयी केंद्रीय आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजापारा महेंद्रभाई कालूभाई यांनी आज नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

शिखर परिषदेची फलनिष्पत्ती म्हणजे एक घोषणापत्र असेल आणि हे घोषणापत्र जागतिक आरोग्य संघटनेच्या WHO नियोजित जागतिक पारंपरिक औषध केंद्राचे भविष्य घडवण्यात संघटनेला मदत करेल, अशी माहिती डॉ. मुंजापारा यांनी या कार्यक्रमाविषयी बोलताना पत्रकार परिषदेत दिली. “गेल्या वर्षी जामनगर येथे पारंपरिक औषधांच्या जागतिक केंद्राच्या पायाभरणी समारंभानंतर, आपण भारतातील या पहिल्या जागतिक शिखर परिषदेचे साक्षीदार होणार आहोत हे अतिशय स्वाभाविक आहे, असेही ते म्हणाले. आपल्या देशातील विविध पारंपारिक औषध पद्धतींनी अलीकडच्या काळात बांधलेल्या बहुआयामी प्रगतीची ही परिषद साक्ष देते.” असे त्यांनी सांगितले.

मानवी आरोग्य, निसर्गाचे संतुलन आणि तांत्रिक प्रगती यांच्यातील परस्परसंबंध ओळखून, भविष्यातील पिढ्यांसाठी अधिक समग्र आणि निरोगी जग निर्माण करण्यासाठी या शिखर परिषदेत एक दिशादर्शक आराखडा विकसित करणे अपेक्षित आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया प्रादेशिक केंद्राच्या आरोग्य प्रणाली विकास विभागाचे संचालक मनोज झालानी यांनी सांगितले.

जगभरातील आणि आयुष मंत्रालयाच्या पारंपरिक औषध पद्धतींचे प्रदर्शन हा यातील आणखी एक महत्वाचा टप्पा असेल. हे प्रदर्शन जगभरातील पारंपरिक औषधांचे सर्वसमावेशक प्रदर्शन असेल आणि जागतिक आरोग्य संघटना आणि आयुष मंत्रालयाच्या विविध प्रादेशिक केंद्रांच्या नेतृत्वाखालील वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीसह पारंपरिक औषधांचा नैसर्गिक वातावरणाशी असलेला परस्परसंबंध ‘कल्पवृक्ष’च्या स्वरूपात त प्रदर्शित करेल.

2022 मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने भारत सरकारच्या सहकार्याने पारंपरिक औषधांसाठी जागतिक केंद्राची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांच्या उपस्थितीत जागतिक आरोग्य संघटना पारंपरिक औषधांसाठी जागतिक केंद्राची पायाभरणी केली. हे केंद्र भारताचे आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांचा एक सहयोगी प्रकल्प आहे आणि जगभरातील पारंपरिक औषधांसाठी हे पहिले आणि एकमेव जागतिक केंद्र आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.