मासे विक्रीसाठी घाऊक मंडई असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटच्या धोकादायक इमारतीचा काही भाग तोडल्यानंतर, तळ मजल्यावरील परवानाधारक मासे विक्रेत्यांना जागा खाली करण्याच्या नोटीस महापालिकेने बजावल्या आहेत. यामुळे मासे विक्रेत्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला असून, याविरोधात जोरदार आंदोलन त्यांनी उभे केले आहे. परंतु या मासे विक्रेत्यांना कुठेही हद्दपार केले जाणार नसून, इमारतीचा भाग पूर्णपणे तोडून त्याठिकाणी त्यांना शेड उभारुन दिली जाणार आहे. त्यामुळे त्या कालावधीत त्यांना आपले व्यवसाय बंद ठेवावे लागणार असून, ऑगस्ट महिन्यामध्ये या सर्व पात्र परवानाधारक विक्रेत्यांचे पुनर्वसन महात्मा ज्योतिबा फुले मंडई(क्रॉफर्ड मार्केट)मध्ये केले जाणार असल्याचे महापालिका सहआयुक्त रमेश पवार यांनी स्पष्ट केले.
बांधकाम तोडण्याचा निर्णय
छत्रपती शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक झाल्याने येथील महापालिकेची कार्यालये यापूर्वीच अन्य ठिकाणी स्थलांतरित करुन वरील मजल्यांचे बांधकाम तोडण्यात येत आहे. त्यामुळे हे बांधकाम पहिल्या मजल्यापर्यंत तोडण्यात आले आहे. आता या इमारतीच्या पहिल्या मजल्यासह संपूर्ण बांधकाम तोडून ते जमिनदोस्त करण्याचा निर्णय न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे या मंडईतील घाऊक मासे विक्रेत्यांना नोटीस पाठवून त्यांना जागा खाली करण्याचे निर्देश देण्यात आले.
(हेही वाचाः कोविड रुग्णांवर अँटीबॉडीज कॉकटेलचा प्रयोग यशस्वी! काय आहे हा नवा प्रयोग?)
विक्रेत्यांमध्ये नाराजी
मात्र, ही धोकादायक वास्तू जमिनदोस्त करताना पर्यायी पुनर्वसन केले जात नसल्याने मासे विक्रेत्यांनी तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली. हे बांधकाम विकासकासाठी तोडले जात असल्याचा आरोप काही विक्रेत्यांनी केला आहे. त्यामुळे जोवर पर्यायी पुनर्वसन होणार नाही तोवर आम्ही जागा खाली करणार नाही, असा इशाराही अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी दिला आहे.
धोकादायक बांधकाम असल्याने निर्णय
याबाबत परवानाधारक विक्रेते आणि कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल, नयना पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बाजार विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांनी बैठक घेऊन त्यांनी कुठेही अन्याय होणार नाही याची खात्री दिली. महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांनी याबाबत बोलताना स्पष्ट केले की, न्यायालयाच्या निर्देशानुसारच ही कार्यवाही केली जात असून ते बांधकाम धोकादायक असल्याने तोडावेच लागेल. कारण ते बांधकाम ठेऊन जर विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास दिला आणि भविष्यात कुठलाही अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार आहे, असा सवाल त्यांनी केला.
(हेही वाचाः मुंबईत १२ रुग्णालयांमधील ऑक्सिजन प्लांट कधी होणार सुरू?)
कोणालाही हद्दपार केले जाणार नाही
हे बांधकाम तोडून पुन्हा त्याच ठिकाणी या परवानाधारक विक्रेत्यांना व्यवसायाकरता शेड बांधून दिली जाणार आहे. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन क्रॉफर्ड मार्केटमध्ये केले जाणार आहे. हे बांधकाम ऑगस्टपर्यंत होणे अपेक्षित आहे. तोपर्यंत त्यांना या शेडमध्ये व्यवसाय करावा लागेल आणि हे बांधकाम जमिनदोस्त करुन नवीन शेड बांधेपर्यंत त्यांना दहा ते पंधरा दिवस आपला व्यवसाय बंद ठेवावा लागेल. परंतु कुठेही या मासे विक्रेत्यांना हद्दपार केले जाणार नाही. कोळी बांधवांना दिलेल्या नोटीसमध्येही तसा उल्लेख आहे. त्यामुळे कुणीही घाबरुन जाऊ नये, असेही आवाहन त्यांनी केले.
Join Our WhatsApp Community