ज्वेलर्स मालकाच्या हत्येप्रकरणी तीन शूटरसह पाच जणांना अटक!

या घटनेमागे केवळ लूट हेच कारण नसून यामागे आणखी काहीतरी वेगळे कारण असून बंटी पाटीदार याला अटक केल्यानंतर हत्येचे मुख्य कारण समोर येईल, अशी शक्यता आहे.

दहिसर येथील रावळपाडा येथे झालेल्या ज्वेलर्स मालक शैलेंद्र पांडे यांच्या मारेकाऱ्यासह पाच जणांना पोलिसांनी सुरत आणि दहिसर येथून अटक केली आहे. मात्र पांडे याच्या हत्येमागचा मुख्य सूत्रधार मध्य प्रदेश रहाणारा बंटी पाटीदार हा फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. ही हत्या लुटीच्या हेतूने झाली नसावी, या हत्येमागचे कारण वेगळेच असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बंटी पाटीदार याच्या अटकेनंतर या हत्येमागचे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

१० विशेष पथके तयार करण्यात आले!

मुंबईतील दहिसर येथील रावळपाडा येथील ओम साईराज ज्वेलर्स या दुकानात भरदिवसा तीन जणांनी प्रवेश करून ज्वेलर्स मालक शैलेंद्र पांडे यांच्या डोक्यात अगदी जवळून दोन गोळ्या फायर करून त्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मारेकऱ्यांनी दुकानातील सुमारे १० लाख रुपयांच्या दागिन्यांसह पोबारा केला होता. दहिसरमध्ये बुधवारी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने संपूर्ण मुंबईत खळबळ उडवून दिली होती. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिमंडळ १२ चे मिळून १० विशेष पथके तयार करण्यात आले होते. या पथकाने घटनास्थळी आणि इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून मारेकऱ्यांचे चेहरे पोलिसांना मिळवून आले होते. तसेच या गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिव्हा दुचाकी देखील छायचित्रे मिळून आले होते.

(हेही वाचाः महापालिकेच्या रडावर आता झोपडपट्ट्या आणि चाळी!)

आरोपींनी गुन्ह्याची दिली कबुली!

पोलिसांनी तांत्रीक आणि खबऱ्याच्या मार्फत तपासावरून दहिसर पूर्वेला राहणाऱ्या चिराग इनामदार रावल (२१) आणि अंकित संजय महाडिक (२१) या दोंघांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांच्या चौकशीत त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक होती, या हत्येसाठी मध्यप्रदेश येथील बंटी पाटीदार याने मध्यप्रदेश येथून तीन शुटर यांना मुंबईत पाठवले होते. पाटीदारने आम्हाला त्या तिघांना मदत करण्यासाठी सांगितले होते, अशी कबुली दिली. मुंबईत आलेल्या या तीन शुटर यांनी मुंबईतून एक्टिव्हा चोरी केली होती व आम्ही मुंबईतून बाहेर पडण्यासाठी मदत केली. दुकानाचीही माहिती दिली होती, अशी कबुली या दोघांना दिली. तसेच त्यांना मुंबईबाहेर जाण्यासाठी आम्ही आमची मोटारसायकल दिल्याचे चिराग आणि अंकित यांनी माहिती दिली.

घटनेमागे केवळ लूट नसून आणखी वेगळे कारण

या माहितीवरून शूटरच्या मागावर असणाऱ्या पोलिसांनी सुरत येथील एका घरातून निखिल चंदेल (२१), उद्य बाली (२१) आणि आयुष पांडे (१९) या तिघांना अटक करण्यात आली असून त्याच्याजवळून एक देशी कट्टा आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. तसेच लुटलेल्या दागिन्यांपैकी अर्धे दागिने या तिघांनी आणि अर्धे दागिने दहिसर येथून अटक केलेल्या दोघांकडून जप्त करण्यात आले आहे. या तिघांना अटक करून मुंबईत आणल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांना मध्य प्रदेश येथे राहणाऱ्या बंटी पाटीदार याने हत्येसाठी सुपारी दिली होती, तसेच देशी कट्टे आणि काडतुसे देखील त्यानेच दिले होते, अशी माहिती दिली होती. दुकानात प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी गोळ्या झाडा त्यानंतर तुम्हाला काय लूट करायची ती करा, असे पाटीदारने आम्हाला सूचना दिली होती, त्यानुसार आम्ही सर्वात आधीच गोळ्या झाडल्या त्यानंतर दागिने लुटूले, अशी कबुली अटक करण्यात आलेल्या शुटर यांनी पोलिसांना दिली. या गोळीबारात ठार झालेला शैलेंद्र पांडे हा मूळचा उत्तरप्रदेश येथे राहणार असून मागील ९ वर्षांपासून मुंबईत तो व्यवसायानिमित्त आला होता. दहिसर येथे दुकान भाड्याने घेऊन तो पत्नी आणि मुलासह दहिसर मधेच राहत होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. या घटनेमागे केवळ लूट हेच कारण नसून यामागे आणखी काहीतरी वेगळे कारण असून बंटी पाटीदार याला अटक केल्यानंतर हत्येचे मुख्य कारण समोर येईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(हेही वाचा : मराठा आरक्षणावरील केंद्राची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here