पालघर आणि नाशिक जिल्ह्यांत पावसाचा मारा सुरु आहे. पालघरमध्ये अतिमुसळधार पाऊस होईल तर नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी होईल. दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने कायम ठेवला.
यासह रायगड, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यालाही मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड येथे अतिमुसळधार तर पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहील. गुजरात राज्याला लागून असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असेल. नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्यावतीने सांगण्यात आले.
ठाणे, मुंबईत सतत पाऊस राहणार नाही. परंतु दोन तीन तासांच्या पावसात 60 मिमी पावसाची शक्यता आहे. दोन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस राहील. रत्नागिरीतही गुरुवारी पावसाचा जोर ओसरेल. कमी ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्गात अतिवृष्टी थोड्या जास्त भागात असेल. परंतु दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट राहील.
विदर्भात पावसाचा धुमाकूळ मंगळवारच्या तुलनेत कमी असेल. दोन्ही जिल्ह्यातील घाट परिसरात मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह काही भागातच अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात केवळ गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
( हेही वाचा: पालघर आणि नाशिकच्या घाट परिसरात जोरदार पाऊस )
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
विदर्भातील गुरुवारी मेघगर्जनेसह केवळ विजांचा कडकडाट होईल. नागपूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट राहील. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यालाही मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट राहील.
पावसाची गैरहजेरी दिसून येणारे जिल्हे
सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि अकोला या जिल्ह्यांसाठी कोणताच इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिलेला नाही. या सर्व जिल्ह्यांना शिडकावा किंवा हलक्या पावसासाठी ग्रीन अलर्ट आहे.