झारखंडच्या चतरामध्ये पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान

99

झारखंडच्या चतरा जिल्ह्यामध्ये जवानांशी झालेल्या चकमकीत २५ लाखांचे बक्षीस असलेले दोन आणि पाच लाखांचे बक्षीस असलेल्या तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. झारखंडमधील चतरा जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणांकडून ही कारवाई करण्यात आली असून त्यानंतर आता पोलिसांनी माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.

काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडमध्ये पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली होती. त्यानंतर आता झारखंडमध्ये तब्बल पाच नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नक्षल्यांचा खात्मा केल्यानंतर त्यांच्याकडून दोन एके-47 सह शस्त्रास्त्र आणि सामग्रीही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. झारखंडमधील पलामू-चतरा सीमेवर सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठे अभियान सुरू केले असून ही कारवाई अजूनही सुरुच असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईसाठी सुरक्षा यंत्रणांकडून सीआरपीएफ, कोब्रा बटालियन, जॅप आणि आयआरबीच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. अन्य माओवाद्याचा शोध घेण्यासाठी चतरा येथील जंगलांमध्ये जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

सुरक्षा यंत्रणांच्या कारवाईत २५ लाखांचे बक्षीस असलेल्या गौतम पासवान आणि चार्लीस उरांव या दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे दोन्ही माओवादी स्पेशल एरिया कमेटीचे सदस्य असून अनेक कारवायांमध्ये त्यांचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय नंदू, अमर गंझू आणि संजीत या तीन माओवाद्यांवर पाच लाखांचे बक्षीस होते. हे तिन्ही माओवादी झोनल कमांडर होते. पाच माओवाद्यांच्या मृत्यूशिवाय १० माओवादी सुरक्षा यंत्रणांच्या गोळीबारात जखमी झाल्याची माहिती आहे.

(हेही वाचा – मांडवामध्ये मंत्री उदय सामंतांच्या बोटीला अपघात; सर्व जण सुखरूप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.