राज्यात वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वातावरण बदलले असून २७ मे रोजी सकाळपासून सर्वत्र आभाळ आलं आहे. या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. तसेच अनेकांच्या घरांचे पत्रेदेखील उडाले आहेत. धाराशिव येथे वादळी वाऱ्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तर, जळगावात (Jalgaon) वादळामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Maharashtra Rain)
माढ्यात शेतात पाणी साचले
सोलापुरच्या माढा (Madha) शहरात २६ मे रोजी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे माढा शहरासह अनेक भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले असून पिकांचे नुकसान झाले. घरावरील पत्रे देखील उडाले. मोहोळ तालुक्यातील देवडी फाट्या जवळील पेट्रोल पंपाचे छत कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
(हेही वाचा – Ukhane in Marathi for Male : पारंपरिक नवरदेवाचे नवे उखाणे)
धाराशिव येथे एकाचा मृत्यू
धाराशिव (Dharashiv) येथील सांगवी या गावात आलेल्या वादळी वाऱ्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हनुमंत कोळपे असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. घरावरील पत्रे उडून गेल्याने दगड डोक्यात पडून हनुमंत कोळपे यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच खा. ओमराजे निंबाळकर आणि आ. कैलास पाटील घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. तसेच महसूल, आरोग्य आणि पोलीस प्रशासनाला पंचनामा करण्याच्या सूचना देखील यावेळी त्यांनी दिल्या.
जळगावात घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात आलेल्या वादळी वार्यामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नानसिंग गुना पावरा (वय 28), सोनाबाई नानसिंग पावरा (वय 22), रतीलाल नानसिंग पावरा (वय 3) बाली नानसिंग पावरा (वय 2) अशी मृतांची नावे आहेत. यावल तालुक्यातील आंबा पाणी गावाजवळील थोरपाणी या आदिवासी पाड्यावर ही घटना घडली. या कुटुंबातील चौघांचे शव बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.
तसेच जळगावच्या जामनेरमध्येही पावसामुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथे तब्बल 3 बिघ्यांवरील केळीच्या बागा जमीन दोस्त झाल्या असून पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळतेय.
(हेही वाचा – राजकोट अग्नितांडव प्रकरणात Gujarat High Court ची महत्त्वाची टिप्पणी!)
वादळी वाऱ्यामुळे मलकापूर पोलीस ठाण्याचे नुकसान
वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे मलकापूर पोलीस ठाण्याचे नुकसान झाले आहे. पोलीस स्टेशन इमारतीवरील पत्रे उडाली आहे. पावसामुळे पोलीस ठाण्यातील क्राईम रेकॉर्ड भिजले असून संगणक, लॅपटॉपचे ही नुकसान झाले आहे. (Maharashtra Rain)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community