डोंबिवलीत उघड्या चेंबरमध्ये पडून पाच वर्षांची चिमुकली जखमी

119

एमआयडीसीच्या दुर्लक्षितपणामुळे उघड्या चेंबरमध्ये पडून पाच वर्षीय चिन्मयी राणे ही मुलगी जखमी झाली आहे. तिचे वडील ही जखमी झाले असून त्यांना किरकोळ जखम झाली आहे. या घटनेची माहिती मनसेचे विभाग अध्यक्ष संजय चव्हाण आणि उपविभागअध्यक्ष सचिन माने यांना कळताच त्यांनी सदर ठिकाणी पाहणी केली. मंगळवारी सकाळी मनसेच्या शिष्टमंडळाने एमआयडीसी डोंबिवली विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला. लवकरच या ठिकाणचे चेंबर बंद करण्यात येणार असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

डोंबिवली पूर्वेकडील निवासी भागातील मंदार राणे हे आपल्या पाच वर्षीय मुलगी चिन्मयीला घेऊन पायी चालत असताना एम्स हॉस्पिटलजवळील एका रस्त्याच्या बाजूला असलेल्या मेन चेंबरच्या बाजूकडील सर्विस चेंबरमध्ये पडले. चिन्मयी चेंबरच्या आत पडल्याने तिला मार लागला. तर तिचे वडील बाजूला पडले. वडिलांनी चिन्मयीला चेंबर मधून बाहेर काढेल. इतर नागरिकही मदतीला धावून आले.

या घटनेची माहिती मनसेचे विभाग अध्यक्ष संजय चव्हाण आणि उपविभाग अध्यक्ष सचिन माने यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जीवघेण्या उघड्या चेंबरमुळे नागरिकांच्या जीवाला धोका असल्याने आजवर एमआयडीसी विभागाने चेंबर बंद का केले नाही याचा जाब चव्हाण यांनी एमआयडीसीचे अधिकारी आव्हाड यांना विचारला. ओमकार शाळा व एम्स हॉस्पीटच्या समोरील सोसायटी आणि बाहेरील चेंबर व गटारातील झाकणे उघडी आहेत. यावर एमआयडीसीचे लक्ष गेले नाही का? चेंबरमधून एखादा नागरिक जखमी झाल्यावर एमआयडीसी विभाग जागे होणार का? ,असे प्रश्न चव्हाण आणि माने यांनी विचारले. लवकरच चेंबरवर झाकणे लागतील आणि अनावश्यक चेंबर बंद केले जातील असे आश्वासन आव्हाड यांनी चव्हाण यांना दिले. याबाबत एमआयडीसीचे अधिकारी आव्हाड यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

(हेही वाचा – दि बर्निंग ट्रेन! या अपघातात सुमारे ८०० लोकांनी गमावले होते प्राण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.