पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे विमानाच्या उड्डाणाला विलंब होणं हे स्वाभाविक आहे. पण कर्नाटकातील मंगळुरू येथे विमानाचे उड्डाण लांबण्याचे कारण खूपच धक्कादायक आहे. प्रियकर आणि प्रेयसीच्या सिक्रेट चॅटमुळे विमानाचे उड्डाण तब्बल 6 तास लांबल्याची घटना रविवारी घडली.
सहा तास विलंब
मंगळुरू येथील विमानतळावरील विमानातून एक तरुण मुंबईला येणार होता. तेव्हा विमानात तो आपल्या प्रेयसीसोबत फोनवर चॅट करत होता. त्यावेळी त्याच्या प्रेयसीने त्याला केलेल्या एका मेसेजमुळे विमानात एकच तारांबळ उडाली. इतकंच नाही तर विमानातील 185 प्रवाशांना खाली उतरवून विमानाची झडती घेण्यात आली आणि त्यामुळे विमान सुटायला सहा तास उशीर झाला.
काय झालं नेमकं?
त्याचं झालं असं की या दोघांमध्ये चाललेलं चॅटिंग विमानात तरुणाच्या शेजारी बसलेला सहप्रवासी वाचत होता. तेव्हा तरुणाच्या प्रेयसीने त्याला गंमतीने यू आर बॉम्बर असा मेसेज केला. हा मेसेज त्या सहप्रवाशाने वाचला आणि त्याने ही माहिती विमानातील क्रू मेंबर्सना दिली. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आणि विमानाचे उड्डाण लांबणीवर टाकत विमानाची झडती घेण्यात आली. अखेर तपासानंतर संध्याकाळी 5 वाजता विमानाने आकाशात झेप घेतली.
या घटनेनंतर संबंधित जोडप्याची पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र चौकशीत ही केवळ गंमत असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी दोघांना सोडून दिले.
Join Our WhatsApp Community