राज्यात पालघर, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोलीला पूराचा धोका

136

गुजरात राज्यातील वलसाड भागांत पूरामुळे नैसर्गिक संकट उभे ठाकलेले असताना राज्यातील पालघर आणि नाशकातही संभाव्य पूराचा धोका वाढला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीतही पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. जुलै महिन्याच्या सलग दुस-या आठवड्यात राज्याला पूरजन्य परिस्थितीचा सामना करण्याची नामुष्की ओढावली, आता नैसर्गिक आव्हानांसमोर राज्याला पुन्हा सामोरे जावे लागणार आहे.

 पालघर, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोलीला पूराचा धोका

गेल्या आठवड्यात रायगड आणि कोल्हापूरातील बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. सुदैवाने पावसाचा जोर वेळीच कमी झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याअगोदरच टळली. मात्र गुजरात पट्ट्याला लागून असलेल्या पालघर आणि नाशिक येथील घाट परिसरात गेल्या तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडला आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे सायंकाळी सहापर्यंत १७५ मिमी, मोखाड्यात १४१.८ मिमी, वाडा येथे १०७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पालघरला गुरुवारपर्यंत अतिवृष्टीसाठी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. नाशकातही गुरुवारपर्यंत अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट कायम असून, घाट परिसरात गेल्या तीन दिवसांतील पावसाची नोंद जास्तच असल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली. गेल्या तीन दिवसांत इगतपुरीत ४६४ मिमी, पेठ येथे ४२९ मिमी, हरसूलमध्ये ३७९ मिमी, त्र्यंबकेश्वरला ३६९ मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाल्याचे मोडक यांच्या नोंदीतून समोर आले. डोंगराळ भागांमधील लोकांनी सतर्कता बाळगावी, नदी-खो-यापासून अंतर बाळगून राहा, असे आवाहनही मोडक यांनी केले.

( हेही वाचा : Bmc election : वांद्रे- सांताक्रुझ पूर्वेची काय आहे स्थिती)

चंद्रपूर जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पावसामुळे ईराई धरणातील पाण्याची पातळी वाढत असून, धरणाचे दरवाजे केव्हाही उघडले जाण्याची शक्यता असल्याची माहिती चंद्रपूर महानगरपालिकेने दिली. ईराई नदीच्या वार्ड-हवेली गार्डन एरीया, नगिनाबाग वार्ड, रहेमत नगर, झरपट नदी, महाकाली वार्डातील नागरिकांना सतर्कतेची सूचना पालिकेच्यावतीने जाहीर करण्यात आली. नदीच्या पात्रापासून दूर सुरक्षित राहा, आपली गुरे व इतर मालमत्ता नदीच्या पात्रापासून दूर ठेवा, असेही आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.