पुरामुळे रस्ते बंद झाल्याने उपचाराअभावी दोन महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना विक्रमगड येथे घडली आहे. पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्याने बंधारे पाण्याखाली गेल्याने पाडा ते रुग्णालयाकडे जाणारा रस्ता बंद झाला. विक्रमगड येथील माळवाडा (म्हसेपाडा) येथे राहणारी लावण्या नितीन चव्हाण ही दोन दिवसांपूर्वी तापामुळे अचानक आजारी पडली. अचानक तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
लावण्याची तब्येत अचानक बिघडल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी तिला मलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यांच्या मुलीला हातात घेऊन तिचे वडील घराबाहेर पडले असले तरी बंधारा पाण्याखाली गेल्याने त्यांना वेळेत रुग्णालयात पोहोचता आले नाही. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने लावण्याचा मृत्यू झाला. मुलगी वडिलांच्या कुशीत मरण पावली. सुविधांअभावी बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर, चिमुरडीच्या मृत्यूने गावकऱ्यांनाही धक्का बसला आहे.
म्हसेपाडा, पावसाळ्यात गारगाई आणि पिंजाळ या दोन नद्यांच्या पाण्याने वेढलेले असते. अशा वेळी गावकऱ्यांना पाड्यातून बाहेर पडण्यासाठी कसरत करावी लागते. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन काही उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. दुर्गम भागात पडणाऱ्या पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक मार्गही बंद आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
Join Our WhatsApp Community