मागेल त्याला पाणी, पण फूल विक्रेत्यांना नाही! माटुंग्यातील फुल विक्रेत्यांचे पुष्पहार पाण्याअभावी कोमेजतात

139

माटुंगा पूर्व येथील तेलंग रोड व भांडारकर रोडवरील माटुंगा पोस्ट ऑफिसला लागून असलेल्या रस्त्यावर मागील ५० वर्षांपासून फूल विक्री व्यवसाय करणाऱ्यांची फुले पाण्याअभावी कोमेजून जात आहेत. या भागातील वाढत्या टॉवरमुळे पाणी मिळवण्याचे सर्व मार्ग बंद झाले असून फुले ताजी ठेवण्यासाठी तथा टवटवीत राखण्यासाठी पाण्याचा शिडकावा होणे आवश्यक असते, परंतु हे पाणीच या फूल विक्रेत्यांना मिळणे दुरापास्त झाले असून आकर्षक कलाकुसरीने बनवलेले फुलांचे हार कोमेजून जात आहेत. एका बाजूला मागेल त्याला पाणी देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्या महानगर पालिकेला या अधिकृत परवानाधारक फुल विक्रेत्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून पाणी उपलब्ध करून देता येत नाही. जशी माणसाला पिण्यासाठी पाण्याची गरज आहे, तेवढी गरज फुले ताजी राखण्यासाठी आहे, हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कधी समजणार असा प्रश्न विचारला जात आहे.

( हेही वाचा : हा १९६२चा नव्हे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भारत आहे; अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा चीनला गर्भित इशारा )

मुंबई महापालिकेने मागील मे महिन्यापासून मागेल त्याला पाणी या धोरणाची अंमलबजावणी लागू करत झोपडीधारकालाही पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पदपथ व्यतिरिक्त असलेल्या जागेवर वसलेल्या झोपडपट्टीतील गरीब व गरजुंना पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एकाबाजुला या अनधिकृत झोपडीधारकाला मानवतेच्या दृष्टीकोनातूनन पाणी दिले जात असले तरी माटुंगा पूर्व येथील तेलंग रोड व भांडारकर रोडवरील पोस्ट कार्यालयाच्या जवळील फूल विक्रेत्यांना अद्यापही पाण्याची जोडणी दिली जात नाही. याठिकाणी ४० हून अधिक फूल विक्रेते असून या सर्वांकडून किमान नळखांब देण्याची मागणी करूनही याबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक निर्णय घेताना दिसत नाही.

माटुंगा पूर्वेमधील या फुलविक्रेत्यांकडून बनवले जाणारे आकर्षक विविध फुलांच्या कलाकुसरीचे हार तसेच विविध फुलांच्या सजावटीमुळे मुंबईतील हे एकमेव असे ठिकाण गणले जात आहे. विविध प्रकारचे फुलांचे उत्कृष्ट हार, देवीच्या वेण्या, पुष्पगुच्छ आणि शोभेचे सजावटीचे हार अनवून संपूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने गेल्या अनेक वर्षांपासून पूर्ण करीत आहेत. हिंदू धर्मात उपासना, पूजा, इतर धार्मिक विधीमध्ये पुष्प यांना सर्वाधिक मान्यता आहे. पुष्प व्यवसाय हा भारतातील भरभराटीचा उद्योग आहे. आजही भारतातील पर्यटनासाठी येणारे पर्यटक हे भारतातील प्रसिध्द फुलबाजारांना भेटी देतात त्या प्रसिध्द फुलबाजारांच्या यादीमध्ये माटुंग्यातील या बाजारांचाही समावेश असल्याने याठिकाणी पर्यटक फुलांचे हार न्याहाळायला आणि फोटो काढण्यासाठी येत असतात.

मागील ५० वर्षांच्या कालावधीपासून हे सर्व पुष्पव्यवसायिक हे व्यवसाय करत असून याठिकाणी टॉवर उभे राहण्यापूर्वी एक ते दोन मजल्यांचा इमारती असेपर्यंत येथील फूल विक्रेत्यांना मैत्री खात्याद्वारे पाणी मिळत होते. त्यामुळे आजवर येथील व्यवसायिकांना पाण्याची समस्या निर्माण झाली नसली तरी जेव्हापासून टॉवर उभे राहिले तेव्हापासून या व्यावसायिकांना तेथून पाणी मिळणे बंद झाले. त्या यासर्व विक्रेत्यांच्या माटुंगा फूल मार्केट असोशिएशनच्यावतीने महापालिकेकडे पाण्याच्या जोडणीसाठी अर्ज करूनही त्याबाबत कोणताही निर्णय घेतला जात नाही. असोशिएशनच्या म्हणण्यानुसार आम्ही याठिकाणी ५० वर्षांपासून व्यवसाय करत असून आम्ही वार्षिक परवान्यांचे नुतनीकरणही करत असतो. त्यामुळे महापालिकेच्या नियमानुसार १५ व्यक्तीमागे एक याप्रमाणे दोन किंवा तीन उभ्या नळखांबाची जोडणी दिली जावी आणि आम्ही व्यावसायिक असल्याने आम्हाला कमर्शियल दराने पाण्याचा दर आकारला जावा,असेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. परंतु महापालिका प्रशासन व जलअभियंता विभाग या फूल विक्रेत्यांना मानवतेच्यादृष्टीकोनातही पाणी उपलब्ध करून देत नाही. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते खासदार, आमदार व स्थानिक नगरसेवकांकडे समस्या मांडूनही प्रशासन फूलांसाठी पाणी द्यायला तयार होत नाही. जर अनधिकृत राहणाऱ्यांना पाणी मिळू शकते, तर मग अधिकृत फूल विक्रेत्यांना फुलांची निगा राखण्यासाठी आणि ती कोमेजून जावू नये म्हणून पाणी द्यायला काय हरकत नाही. जर मागेल त्याला पाणी मिळणार असेल तर या फुलांना ताजी टवटवीत राखण्यासाठी पाणी न देण्यासाठी मानवतेच्या दृष्टीकोनाचा निकष का लागू शकत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे

या फूल विक्रेत्यांना जलजोडणी देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या ऍड.गीत कस्तुरी या सातत्याने महापालिकेशी पाठपुरावा करत असून प्रशासनाकडून केवळ याबाबत धोरण नसल्याचे सांगत या फुल विक्रेत्यांना पाण्याचा लाभ देण्यापासून वंचित ठेवले जात आहे. स्थानिक माजी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनीही आपला यासाठी प्रशासनाशी पाठपुरावा सुरु असल्याचे सांगितले. महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पदपथावर जलजोडणी देण्याचे धोरण नसून हे फूल विक्रेते ५० वर्षांपासून व्यवसाय करत असल्याने आणि फुलांसाठी पाण्याची मागणी असल्याने जलअभियंता विभागाकडे हा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे यांना कशाप्रकारे जोडणी देता येईल याचा अभ्यास सुरु असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.