वैद्यकीय क्षेत्रातील औषध विक्रेत्यांच्या माहितीचा दस्तावेज अन्न व औषध प्रशासनाकडून सांभाळला जातो. संबंधित गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या संकेतस्थळावरून औषध विक्रेते अपडेट करतात. औषध आणि वैद्यकीय उपकरणांशी संबंधित औषध विक्रेते आणि उत्पादकांनी संकेतस्थळावर अपलोड केलेली गोपनीय माहिती फुटत असल्याचा आरोप ऑल फूड एण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत आपण लक्ष घालू असे आश्वासन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिली.
संकेतस्थळावर विविध परवान्यांवर मान्यता मिळाल्यानंतर विक्रेत्यांना बिलिंग सॉफ्टवेअर विकत घेण्यासाठी विविध कंपन्यांकडून फोन येऊ लागल्याने याबाबत कल्पना आल्याची माहिती पांडे यांनी दिली. संकेतस्थळावर औषध विक्रेत्यांनी अपलोड केलेली माहिती अत्यंत गोपनीय असते. परवान्यांसाठी आवश्यक कागदपात्र, अर्जदार विक्रेत्याची खासगी माहिती, संपर्क क्रमांक आदी माहिती फुटणे सुरक्षेच्या मुद्द्यावरून योग्य नसल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले.
(हेही वाचा – कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत बदल होणार)
औषधांच्या निर्मितीचा फॉर्म्युला, त्याबाबतीतले संशोधन, विविध आजारांवरील नवीन संशोधन, नव्या औषधांसाठीचे वितरण आदी माहिती फुटल्यास चुकीचा वापरही केला जाऊ शकतो अशी भीती अन्न व औषध प्रशासनाच्या माजी अधिकाऱ्यांनी दिली. औषध निर्माण क्षेत्रातील माहिती फूटत असल्याच्या तक्रारी आम्ही सातत्याने अन्न व औषध प्रशासनाकडे करत असल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले. थेट संकेतस्थळावरून माहिती सॉफ्टवेअर कंपन्यांना देणे जिकरीचे ठरू शकते अशी भीतीही औषध विक्रेत्यांनी व्यक्त केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community