मुंबई व नजीकच्या हॉटेल व्यावसायिकांना अन्नपदार्थांत वापरल्या जाणा-या मसाले बनवण्याचे काम करणा-या वसईतील नायगावमधील मेसर्स जे.जे. सिझनिंग एण्ड स्पाइसेस या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी धाड टाकली. या कंपनीत तयार होणारे मसाले तसेच त्यांच्या दर्ज्याबाबत साशंकता असल्याची गुप्त तक्रार अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या तक्रारीच्या आधारे गुरुवारच्या कारवाईत तब्बल ५३ लाख ७७ हजार ३२२ रुपयांच्या अन्नपदार्थांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला. अधिका-यांच्या तपासणीत अन्नपदार्थ्यांच्या दर्ज्याबाबत शंका व्यक्त करण्यात आली आहे. हा व्यवसाय बंद करण्याची नोटीसही संबंधित कंपनीला दिल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे येथील कोकण विभागाचे सहआयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी दिली.
जप्त केलेल्या अन्नपदार्थांचा साठा –
१) उत्पादन प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी पात्रताधारक व्यक्तीची नेमणूक नसणे, कंपनीत काम करणा-या कर्मचा-यांचे फास्टट्रॅक ट्रेनिंग नसणे.
२) कंपनीतील अन्नपदार्थाचे तसेच कच्च्या मालाचे मान्यताधारक एन ए बी एल प्रयोगशाळेतून तपासणी न करणे
३) कंपनीतील विक्री केलेल्या अन्नपदार्थांच्या व्यवहाराविषयी लेखी नोंद न ठेवणे
४) कंपनीत काम करणा-या कर्मचा-याची त्वचारोग तसेच संसर्गजन्य आजारांची वैद्यकीय तपासणी नसणे
कंपनीवर धाड टाकल्यानंतर आम्हांला अनेक गोष्टींबाबत त्रुटी आढळून आल्या. अन्नपदार्थ बनवण्याची प्रक्रिया नियमबाह्य सुरु होती. या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत कंपनीला व्यवसाय बंद ठेवावा लागेल, तसे न घडल्यास दोन लाखांपर्यंतचा दंड कंपनीविरोधात ठोठावला जाऊ शकतो. – सुरेश देशमुख, सह आयुक्त, कोकण विभाग, ठाणे, अन्न व औषध प्रशासन