मुंबई महापालिकेच्या सभागृहनेत्या विशाखा राऊत यांच्या प्रभागातील दोन महिन्यांपासून खोदलेला फूटपाथ अखेर बनवण्यात आला आहे. हिंदुस्थान पोस्टने चालवलेल्या फूटपाथबाबतच्या मालिकेतून येथील फूटपाथच्या दुरावस्थेबाबत आवाज उठवण्यात आला होता.
त्याची दखल लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाने घेतली असून, तातडीने या फूटपाथची सुधारणा करण्याचे काम केले. त्यामुळे टी.एच. कटारिया मार्ग आणि लेडी जमशेटजी मार्गावरील खोदलेल्या फूटपाथवरुन चालताना नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती, त्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.
(हेही वाचाः सभागृह नेत्यांच्याच प्रभागात फूटपाथ उखडलेले)
हिंदुस्थान पोस्टची मोहीम
मुंबईत महापालिकेच्यावतीने पदपथ धोरण बनवण्यात आले असले, तरी त्या धोरणानुसार पदपथांच्या सुधारणेकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे तुटलेल्या, फुटलेल्या आणि निखळलेल्या लाद्यांच्या तसेच पेव्हरब्लॉकच्या फूटपाथविरोधात हिंदुस्थान पोस्टने मोहीम सुरू केली. फूटपाथ कुणाचे, माझे फूटपाथ, माझी जबाबदारी याअंतर्गत फूटपाथच्या सुधारणेसाठी राबवलेल्या या मोहिमेची सुरुवात महापालिकेच्या सभागृहनेत्या विशाखा राऊत यांच्या प्रभाग क्रमांक १९१ पासून केली होती.
(हेही वाचाः दादरच्या ‘त्या’ तीन रोडच्या फूटपाथकडे दुर्लक्ष का?)
नागरिक आणि दुकानदारांनी उठवला आवाज
या प्रभागातील माटुंगा स्टेशन रोड असलेल्या टी.एच.कटारिया मार्गवरील श्री विला इमारत ते सिटी लाईट सिग्नलपर्यंत व एल.जे. मार्गावरील सिटी लाईट सिनेमा ते राजा बढे चौकापर्यंतचे फूटपाथ मागील एक ते दीड महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आले होते. टाटाची केबल टाकण्यात आल्यानंतर या फूटपाथच्या अर्धवट कामांकडे लक्षच दिले जात नव्हते. परंतु स्थानिक नागरिक आणि दुकानदारांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत या मोहिमेंतर्गत आवाज उठवण्यात आला.
(हेही वाचाः दादासाहेब फाळके मार्गाच्या फुटपाथवरुन कसे चालाल?)
कामाला सुरुवात
त्याची दखल घेत जी-उत्तर विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेविका व सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी तातडीने लक्ष देत या कामाला प्राधान्यक्रम दिला. त्यामुळे हे काम याबाबतच्या वृत्तानंतर दोन दिवसांमध्ये सुरू झाले असून, याबाबत स्थानिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
(हेही वाचाः प्रिन्सेस स्ट्रीट, दवा बाजार, लोहार चाळीत चाला पण स्त्यावरुन)
फूटपाथ बनले, पण दर्जा नित्कृष्ट
टी.एच. कटारिया मार्गावरील काम चार दिवसांपूर्वी करण्यात आले. परंतु चार दिवसांमध्ये या मार्गावरील संदेश हॉटेल, शिरोडा पंचक्रोशी, महाराष्ट्र बँक, अजय शॉपिंग सेंटर, समाधान हॉटेल, काशी विश्वेश्वर मंदिर आदी परिसरांमध्ये फूटपाथचे काम योग्यप्रकारे झालेले नाही.
हे काम नित्कृष्ट दर्जाचे झाले असून, दोन दिवसांपूर्वी बनवलेल्या फूटपाथवरील स्टॅपिंग झिजून गेले आहेत. तर काही ठिकाणी स्टॅपिंगच करण्यात आले नसून, केवळ काँक्रीट टाकून फूटपाथ समतल करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे दिसते.
(हेही वाचाः खड्डे बुजवण्याच्या नित्कृष्ट कामाची मनसेकडून पोलखोल)
स्थानिक दुकानदारांच्या म्हणण्यानुसार कंत्राटदारांच्या लक्षात ही बाब आणून दिली. मात्र, स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत आणि शिवसेना शाखाप्रमुख अजित कदम यांनी याची दखल घेत ते काम योग्यप्रकारे होईल याची ग्वाही दिली आहे.
फूटपाथचे काम सुरू केल्यानंतर पाऊस आल्याने काँक्रीट ओले राहिले आणि पादचाऱ्यांना त्यावरुन चालण्याचा मार्ग बंद केल्यानंतरही, त्यांनी बांधलेल्या दोऱ्या तोडून चालण्याचा प्रयत्न केला. तसेच फेरीवाल्यांनी त्वरित त्यावर सामान आणून व्यवसाय करण्यास सुरुवात केल्याने फूटपाथचे काम केल्यानंतर खराब झाल्याचे दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community