दादरच्या ‘त्या’ तीन रोडच्या फूटपाथकडे दुर्लक्ष का?

तिन्ही रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या फूटपाथच्या लाद्या मागील दोन ते अडीच वर्षांपासून उखडलेल्या आहेत.

89

मुंबईत खरेदीचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आणि दररोज गर्दीने व्यापून जाणाऱ्या दादर रेल्वे स्थानकाचा पश्चिम भाग. याठिकाणी रानडे मार्ग, डिसिल्व्हा मार्ग आणि जावळे मार्ग या तिन्ही मार्गांवर असणाऱ्या फूटपाथची अवस्था एवढी खराब आहे की, ‘ए भाय जरा देख के चलो’ असेच म्हणण्याची वेळ येते. रेल्वे स्थानक मार्ग असलेल्या या तिन्ही रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या फूटपाथच्या लाद्या मागील दोन ते अडीच वर्षांपासून उखडलेल्या आहेत.

Road 6

परंतु स्थानिक नगरसेविका प्रिती पाटणकर यांचे मात्र याकडे लक्ष नाही. फूटपाथवरील लाद्या उखडून वर आल्याने लोकांची पडझड होत असल्याचे निवेदनही येथील प्रत्येक दुकानदाराने लोकप्रतिनिधींना दिले. पण आजतागायत या फूटपाथची सुधारणा करण्यासाठी ना नगरसेविका पुढाकार घेतात, ना प्रशासनातील कर्तव्यदक्ष सहायक आयुक्त किरण दिघावकर पुढाकार घेताना दिसतात.

Road 1

(हेही वाचाः सभागृह नेत्यांच्याच प्रभागात फूटपाथ उखडलेले)

अशी आहे फूटपाथची अवस्था

दादर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या रानडे मार्ग, डिसिल्व्हा मार्ग आणि जावळे मार्गावरील फूटपाथची जागा आधीच फेरीवाल्यांनी व्यापून टाकली आहे. दुसरीकडे दुकानदारांनीही आपले सामान फूटपाथवर पुढे सरकावले आहे. त्यामुळे जी काही एक ते दीड फुटांची जागा उरते, त्यातून रस्ता काढत पादचारी जात असतात. जावळे मार्गावरील केशवसूत उड्डाणपुलापासून ते पुढे सुरती फरसाण दुकानापर्यंत लाद्या उखडून गेल्या आहेत.

Road 4

कुठे लाद्या उखडलेल्या, तर कुठे फेरीवाल्यांचे अतिक्रमण

डिसिल्व्हा रोडवरील विसावा हॉटेल आणि पलिकडील टायटन शो रुमपासून स्थानकाच्या दिशेला असलेल्या दोन्ही बाजूंच्या फूटपाथवर एकही लादी चालण्यालायक नाही. लादीवरुन चालताना पादचाऱ्यांना उड्या मारत चालावे लागते नाहीतर पडून ढोपर फोडून घ्यावे लागते.

Road 2

(हेही वाचाः साडेपाच वर्षांत पदपथांची सुधारणा किती?)

हीच परिस्थिती रानडे मार्गाच्या स्टेशनपासून सुरू होणाऱ्या दोन्ही फूटपाथची आहे. एका बाजूला दुकान आणि दुसरीकडे फेरीवाले यांच्याकडे न्याहाळत जाणाऱ्यांना खाली उचकून पडलेल्या पेव्हरब्लॉकचा अंदाज येत नाही आणि ठेच लागून त्यांची आदळआपट होते. पण स्थानिक नगरसेविका म्हणून या फूटपाथच्या सुधारणेकडे पाटणकर यांचे लक्ष दिसून येत नाही.

Roa 1

रानडे मार्गावर सिग्नलपुढे चांगल्या दर्जाचा फूटपाथ बनवण्यात आला, पण त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण आहे. त्यांनी बाहेर अडकवलेल्या कपड्यांमधून नागरिकांना चालता येत नाही, मग फूटपाथ फेरीवाल्यांना त्यांचा व्यवसाय चालवायला बनवला की लोकांना व्यवस्थित चालता यावे म्हणून, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाच वर्षांपूर्वी पदपथ धोरण बनवण्यात आले आहे. परंतु हे धोरण अजूनही बासनात असून किमान रस्ते नको, फूटपाथवरुन तरी आम्हाला चांगल्याप्रकारे चालू द्या, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Road 3

 

(हेही वाचाः किती दिवस आदळत, आपटत चालणार? फोटो काढा, आम्हाला पाठवा)

हिंदुस्थान पोस्टची मोहीम

मुंबईतील फूटपाथच्या दुरावस्थेबाबत जनतेचा आवाज उठवण्यासाठी हिंदुस्थान पोस्टने फूटपाथ कुणाचे? या मालिकेच्या माध्यमातून पदपथांच्या सुधारणेसाठी मोहीम राबवली आहे. या मोहिमेला जनतेकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून, आता नागरिकांनीही आपल्या विभागातील तुटलेल्या, फुटलेल्या आणि असमतल असलेल्या फूटपाथचे फोटो पाठवण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी पाठवलेले हे फोटो प्रसिध्द केले जाणार आहेत. मुंबईकरांसाठी जोवर चांगले फूटपाथ बनवले जाणार नाहीत तोवर ही मोहिीम अशीच सुरू राहणार आहे. नागरिकांनी 8591886226/9324321033 या व्हॉट्सअप क्रमांकांवर आपल्या विभागातील चालण्यायोग्य नसलेल्या फूटपाथचे फोटो जरुर पाठवावेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.