मुंबईत एका बाजूला योग्यप्रकारे चालता येतील अशाप्रकारच्या फुटपाथच्या शोधात नागरिक असताना, प्रिन्सेस स्ट्रीट आणि काळबादेवी परिसरात काँक्रीटीकरण केलेल्या फूटपाथवर विशिष्ट समाजाने संसार थाटत पादचाऱ्यांची वाट अडवून बसत आहेत. पादचाऱ्यांना विना अडथळा चालता यावे म्हणून लाखो रुपये खर्च करुन फूटपाथची सुधारणा करण्यात आली. त्याच पदपथावरुन नागरिकांना चालता येत नाही. भाजपाचे स्थानिक नगरसेवक आकाश पुरोहित यांना आपल्या खोदून ठेवलेल्या फूटपाथची सुधारणा दोन ते तीन महिने झाली तरी करता येत नसल्याने, नागरिकांना अडखळतच चालावे लागत आहे.
(हेही वाचाः दादरच्या ‘त्या’ तीन रोडच्या फूटपाथकडे दुर्लक्ष का?)
फूटपाथवरुन चालणे अशक्य
मरिन लाईन्स येथील चंदन वाडी, प्रिन्सेस स्ट्रीट,काळबादेवी, दवा बाजार, बाबू गेनू रोड या नवीन हनुमान लेन, मंगलदास मार्केट, लोहार चाळ आदी भागांतील फूटपाथच्या पाहणीत चंदन वाडी, पारशी डेरी आणि समोरील अग्यारी हे दोन्ही फूटपाथ खोदून ठेवले आहेत. अग्यारीच्या समोरील फूटपाथ तीन महिन्यांपूर्वी खोदून त्यावर सिमेंटचा कच्चा थर चढवला. तर काही अग्यारी समोरील खोदकाम तसेच आहे. पण या फूटपाथचे काम अर्धवट असताना आता पारशी डेरी ते सारस्वत बँक पर्यंत खोदकाम करण्यात येत आहे. दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, कंत्राटदार लक्ष देत नसून नगरसेवकही सिमेंटचे कच्चे काँक्रीटीकरण झाल्याने फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे मरिन लाईन्स स्टेशनकडून दवा बाजारकडे जाणाऱ्या दोन्ही फूटपाथवरुन धड चालताही येत नाही.
(हेही वाचाः सभागृह नेत्यांच्याच प्रभागात फूटपाथ उखडलेले)
दवा बाजार मधील दोन्ही फूटपाथ सुस्थितीत आणि काँक्रीटीकरण केले असले तरी हे फूटपाथ विशिष्ट समाजाच्या लोकांनी अडवून ठेवले आहेत. त्यांचा संसारच तिथे असून ते तिथेच धंदा करतात आणि तिथेच राहतात. त्यामुळे त्यांची भांडीकुंडी व इतर सामान तिथेच असल्याने लोकांना चालण्यासही जागा नसते. येथील न्यू हनुमान लेनमध्ये उजवीकडील बाजूला एकमेव फूटपाथ आहे. डावीकडे दुकांनाचा दरवाजा थेट रस्त्यांवर उघडतो. पण जो एकमेव फूटपाथ आहे, त्याचा विकास नवीन पदपथ धोरणानुसार टाईल्सच्या लाद्यांचा तुकड्यांचा वापर करत बनवले.
(हेही वाचाः किती दिवस आदळत, आपटत चालणार? फोटो काढा, आम्हाला पाठवा)
परंतु हा विकास केलेला फूटपाथही ठराविक समाजाच्या लोकांनी सामान ठेऊन आणि संसार थाटून अडवून ठेवला. एका बाजूला फूटपाथ असूनही त्याचा वापर नाही, दुसरीकडे रस्त्याचा ६० ते ६५ टक्के भाग हा वाहनांनी अडवून ठेवलाय. त्यामुळे वाहने आणि लोकांना चालण्याचा एकच मार्ग असून एरव्ही नॉन पार्किंगच्या विभागातून गाड्या टोइंग करुन न्यायला सहकार्य करणारे महापलिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवक यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
(हेही वाचाः अभियंत्यांना खड्डे पावले : इतर कामांमधून करणार कार्यमुक्त)
दवा बाजार, राजकोट नागरी सहकारी बँकेजवळ दोन महिन्यांपूर्वी बेस्टची केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. पण आजतागायत या खोदलेल्या भागाची सुधारणा करण्यात आली नाही. मातीचा ढीग तिथेच पडून राहिला आहे. त्यामुळे जे फूटपाथ सुस्थितीत आहेत, त्यावरुनच लोकांना चालता येत नाही. या उलट मंगलदास मार्केटपासून लोहार चाळीकडे जाणाऱ्या मार्गाच्या उजवीकडील फूटपाथ आधीच अरुंद, त्यात त्यावरुन हातगाडी आणि दुकानांचे वाढीव भाग पुढे आहेत. येथील फूटपाथवर कच्चे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले असून, हेही काम कंत्राटदाराने अर्धवट सोडले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांचे विभागात लक्ष नसल्याचे पाहायला मिळत आहे.
(हेही वाचाः मार्केट परिसरात वाहतूक पोलिसांकडून होणारी कारवाई थांबवा- श्रीरंग बरगे)
Join Our WhatsApp Community