अडथळ्यांच्या शर्यतीतून पादचाऱ्यांची सुटका; दादरचे पदपथ कात टाकणार!

88

दादर पश्चिम रेल्वे स्थानकासमोरील रस्त्याची सलग्न पदपथांच्या विकासाअभावी दुरवस्था झाली होती. परिणामी या पदपथावरील निखळलेले पेव्हर ब्लॉग आणि असमांतर पदपथ यामुळे नागरिकांना चालताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत असे. परंतु पादचाऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता या पदपथाचे मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाने नूतनीकरण हाती घेतले असून येथील सर्व पदपथ पेव्हर ब्लॉक ऐवजी सिमेंट काँक्रीटचे केले जाणार आहेत. तब्बल सात वर्षाने या पदापथांचा विकास केला जात आहे त्यामुळे निश्चितच दादरला येणाऱ्या पादचाऱ्यांसह रेल्वे प्रवाशांना चालताना दिलासा मिळणार आहे.

( हेही वाचा : दादरकरांचे पाय खड्डयात: सर्व पदपथांवरील पेव्हरब्लॉक उखडलेले )

दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस सेनापती बापट मार्गाला जोडून रानडे मार्ग, एन. सी. केळकर मार्ग आणि डिसिल्व्हा मार्ग जात असून केशवसुत उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या सेनापती बापट मार्ग आणि त्यांना जोडणाऱ्या या तीन रस्त्यांच्या सलग्न मागील सात वर्षांपासून विकास तथा नूतनीकरण झाले नव्हते. या पदपथांवरील बऱ्याच भागात पेव्हर ब्लॉक उखडलेले असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक तथा महिला व पुरुष पडून ते गंभीर जखमी झाले होते.

या निखळलेल्या पदपथांमुळे कधी आपटून पडणे तर पावसाळयात पाणी आणि चिखलाचा शिडकावा अंगावर होऊन कपडे खराब होणे असे प्रकार घडत होते. नागरिकांना होणाऱ्या अडचणींची दखल घेत ‘हिंदुस्तान पोस्ट’ने पदपथांच्या सुधारणेसाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुटलेले व खोदलेल्या पदपथांची छायाचित्रांसह मालिका प्रकाशित करून दादरच्या या पदपथांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कोविड अभावी ही कामे काही वर्षापासून होऊ शकले नसले तरी मुंबई सुशोभीकरण अंतर्गत मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर विभागाने आता दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरातील पदपथांची नूतनीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे.

ज्यामुळे येथील जनतेला चांगल्या दर्जाचे पदपथ उपलब्ध होणार आहे. या सर्व पदपथांवर पेव्हर ब्लॉकमुळे पादचाऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता महापालिकेच्या जी-उत्तर विभागाने या पदपथांवर पेव्हर ब्लॉकऐवजी नवीन धोरणानुसार स्टॅम्पिंग काँक्रीट पद्धतीने या पदापदांची सुधारणा करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यानुसार केशवसुत उड्डाणपूलाखालील सेनापती बापट मार्गावरील पदपथाची सुधारणा केली असून आता लवकरच एन.सी केळकर मार्ग, रानडे मार्ग आणि डिसिल्व्हा रोड या मार्गाच्या पदपथांचीही सुधारणा केली जाणार आहे.

( हेही वाचा : दादरच्या ‘त्या’ तीन रोडच्या फूटपाथकडे दुर्लक्ष का?)

२०१६ मध्ये मुंबई महापालिकेच्यावतीने शेवटची पदपथांची सुधारणा करण्यात आली होती, तेव्हापासून आजतागायत या पदपथांची सुधारणा झाली नव्हती . सन २०१२ मध्ये निवडून आलेले तत्कालीन मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांच्या कारकीर्दीत या पदपथाची सुधारणा झाली होती. त्यानंतर या प्रभागात शिवसेनेच्या नगरसेविका प्रीती पाटणकर या निवडून आल्या होत्या. परंतु या पाच वर्षांच्या काळात त्यांनी अनेकदा पदपथांवरील तुटलेल्या पेव्हर ब्लॉकबाबत स्थानिक तसेच नागरिकांनी तक्रार केल्यानंतर याच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यासाठी प्रयत्न केला नाही. काही महिन्यांपूर्वी जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तुटलेला पेव्हर ब्लॉक बदलून देखभाल विभागाच्या वतीने डागडुजी केली होती. परंतु या तात्पुरत्या मलमपट्टीनंतर या सर्व पदपथांच्या नूतनीकरणाचे काम हाती घेत सर्व पदपथांचा विकास केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.