गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी एकादशीच्या वारीत आपल्या अवयवदान आणि आरोग्य दिंडीसह सामील होणाऱ्या दोस्त मुंबई या संघटनेने या वर्षापासून अवयव दान आरोग्य क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘दोस्त दिंडी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्याचे ठरवले आहे. २०२३ या वर्षीच्या या पुरस्कारासाठी डॉ. वत्सला त्रिवेदी, डॉ. प्रवीण शिंगारे आणि डॉ. अरूणकुमार भगत यांची निवड झाली आहे.
येत्या १० जून रोजी नवी मुंबईतील कामोठे येथील आगरी समाज सभागृहात सकाळी १० वाजता होणाऱ्या अवयवदान दिंडीच्या प्रस्थान सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या प्रस्थान व सत्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र जीएसटीचे उपायुक्त डॉ. विजय डांगे, मंत्रालयातील महसूल विभागाचे उपसचिव डॉ. सत्यनारायण बजाज तर ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर हे या सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कार विजेत्यांचा परिचय
डॉ. वत्सला त्रिवेदी
ज्येष्ठ शल्यचिकित्सक व अवयव प्रत्य़ारोपण तज्ञ्ज डॉ. वत्सला त्रिवेदी यांनी महाराष्ट्रातील मेंदूमृत रुग्णालयतील मूत्रपिंडाचे (किडनी) पहिले यशस्वी प्रत्यारोपण २७ मार्च १९९७ रोजी करून इतिहास घडविला. याशिवाय अवयव प्रत्यारोपण क्षेत्रातील महत्वाच्या विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती (झेडटीसीसी)ची पायाभरणी संस्थापक सचिव या नात्याने केली.
(हेही वाचा – Top University : देशभरातील टॉप-10 उच्च शिक्षण संस्थांमध्ये 7 IIT; तर महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ नाही)
डॉ. प्रवीण शिंगारे
आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण व प्रशासन क्षेत्रातील भीष्माचार्य म्हणून डॉ. प्रवीण शिंगारे ओळखले जातात. अवयवदान कायद्याचे प्रगाढ पंडित असल्याने या विषयावर त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक क्लिष्ट कायदेशीर प्रक्रिया सुलभ करून आणि ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रुग्ण तसेच तज्ज्ञ डॉक्टरांना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्याचे महान कार्य त्यांनी आजवर केले आहे. त्यामुळे हजारो गरजू रुग्णांचे अवयव प्रत्यारोपण यशस्वी होऊन त्यांना जीवनदान लाभले.
डॉ. अरुणकुमार भगत
पनवेल महापालिकेचे आरोग्य सभापती, लोकप्रतिनिधी आणि वैद्यकीय क्षेत्रातील संघटनांचे पदाधिकारी म्हणून कार्य करताना डॉ. अरुणकुमार भगत यांनी आपल्या पदांचा प्रभावी वापर करून अवयवदानाबद्दल जाणीव जागृती वाढविण्यासाठी अमूल्य योगदान दिले आहे. भगत कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यांच्या आईंच्या जन्मदिनी अवयवदानाचा संकल्प करून समाजासाठी एक नवा आदर्श ठेवला.
प्रस्थान सोहळा १० जूनला
धन्वंतरीज ऑर्गनायझेशन फॉर सोशियो-हेल्थ ट्रॉन्सफॉर्मेशन (दोस्त) या संस्थेचे संस्थापक आणि अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. कैलाश जवादे हे दरवर्षी आषाढी वारीत अवयवदान दिंडी घेऊन सहभागी होतात. या दिंडीत वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, त्यांच्यावर विविध उपचार, औषधे वाटप केले जाते. तसेच पथनाट्य, भारूड, लोकगीते या माध्यमातून सर्वसामान्यांच्या भाषेत अवयवदानाबद्दल जाणीव जागृती केली जाते. या दिंडीचा प्रस्थान सोहळा कामोठे सेक्टर १५ मधील आगरी समाज सभागृहात सकाळी १० वाजता रंगणार आहे. या वेळेस वारीत सामील विद्यार्थी पथनाट्ये, भारूड आणि नृत्य सादर करणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community