सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळांनी इयत्ता १२ वीच्या निकालाचा ‘३०:३०:४०’ असा फॉर्म्युला ठरवल्यानंतर आता राज्याच्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही हाच फॉर्म्युला स्वीकारण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती सूत्रांकडून समजते. येत्या २ दिवसांत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे, मात्र या फॉर्म्युलाने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने याबद्दल आतापासूनच विरोधी सूर ऐकू येवू लागला आहे.
१०वीच्या निकालामुळे १२वीची टक्केवारी घसरणार?
१२ वीचा निकाल लावण्यासाठी १०वीचा निकाल ३० टक्के, ११ वीचा निकाल ३० टक्के, तर १२ वीच्या अंतर्गत मूल्यमापनावर ४० टक्के गुण दिले जाणार आहेत. या फॉर्म्युल्याचा विचार केल्यास १० वीच्या निकालाचे मूल्यमापन १२ वीच्या निकालासाठी केल्यास हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. कारण १० वीतील शैक्षणिक निर्देशांक हा १२ वीमध्ये तितकाच नसतो. असे लाखो विद्यार्थी आहेत, जे दहावीला कमी गुण मिळवून उत्तीर्ण झालेले असतात त्याच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक निर्देशांक १२ वीपर्यंत वाढलेला असतो, उदाहरणार्थ जे विद्यार्थी १० वीला द्वितीय श्रेणीतून उत्तीर्ण झालेले असतील, त्यांनी १२ वीपर्यंत डिस्टिंक्शन मिळवण्याची क्षमता निर्माण केलेली असते, त्यांच्या १२ वीच्या टक्केवारीत १० वीच्या निकालाचे मूल्यमापन केल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरणार आहे. तसेच जे विद्यार्थी दहावीला अनुत्तीर्ण झालेले असतील त्यापैकीही हजारो संख्येने असे विद्यार्थी असतात ज्यांनी तळमळीने अभ्यासाच्या जोरावर १२ वीमध्ये उत्तम गुण मिळवण्याची क्षमता निर्माण केली असते, त्याही विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे.
(हेही वाचा : मागील इयत्तांच्या निकालांवर १२वीचा निकाल?)
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला बसणार खीळ!
सध्या समाजात अशी असंख्य उदाहरणे आहेत की दहावी अनुत्तीर्ण झालेली अथवा कमी गुण मिळवले विद्यार्थी १२ वीत उत्तम गुण मिळवून स्पर्धा परीक्षा देण्याची क्षमता निर्माण करतात, तसेच अनेक जण प्रवेशपूर्व परीक्षा देऊन वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश मिळवून पुढे डॉक्टर, अभियांत्रिक बनलेले आहेत. अशी क्षमता निर्माण केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यंदाच्या निकालामुळे खीळ बसणार आहे.
१२वीच्या निकालात १०वीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय नको!
मार्च २०१७मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत १ लाख ८ हजार विद्यार्थी नापास झाले होते, तर १ लाख २५ हजार विद्यार्थी मार्च २०१८ या वर्षी नापास झाले होते. यापैकी काही हजारांच्या संख्येने विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊन कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेऊन यंदाच्या वर्षी १२ वीला आले असतील, त्या हजारो विद्यार्थ्यांच्या १२वीच्या निकालाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ नये, म्हणून त्यांच्यावर अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने त्यांच्या १०वीच्या गुणांचे मूल्यमापन करण्यात यावे, अशी अपेक्षा शिक्षण तज्ज्ञ करत आहेत.
(हेही वाचा : यंदा ५वी पास मुन्नाभाई १०वी पास होणार!)
Join Our WhatsApp Community