शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शनिवारी (१ जुलै) महापालिका कार्यालयाला सुट्टी असते आणि शनिवार व रविवारी महापालिका मुख्यालयात पर्यटक हे हेरिटेज वॉक करता महापालिका मुख्यालयाची हेरिटेज वास्तू पाहण्यासाठी येत असतात. आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातूनच हे हेरिटेज वॉक सुरु झाल्याने शनिवारी काढण्यात येणाऱ्या या मोर्च्याची अनेकांकडून खिल्ली उडवली जात असून महापालिका कार्यालय बंद असताना आदित्य ठाकरे हे हेरिटेज वॉक साठी बहुधा येत असावेत असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे १९८५ नंतर प्रथमच शिवसेनेला महापालिकेवर मोर्चा काढण्याची वेळ आली असून जो पक्ष आजवर महापालिकेच्या कारभाराची सुत्रे हाती घेऊन विरोधकांचे आरोप आणि टिका उधळवून लावायचा तोच पक्ष आता महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी मोर्चा घेऊन येताना दिसणार आहे.
मुंबई महापालिकेत रस्त्यांच्या नावाने, जी-२०च्या नावाने दिवसाढवळ्या उधळपट्टी सुरु आहे. रस्ते घोटाळा,खडी घोटाळा दिवसाढवळ्या सुरु आहे. नगरसेवक असतात, त्यावेळी प्रस्तावांवर सर्व पक्षीय प्रतिनिधींसमोर चर्चा होऊन मंजुरी नामंजुरी होते. त्यानंतर कंत्राट दिले जाते. आता मुंबईला मायबापच राहिलेला नाही, सगळी उधळपट्टी सुरु आहे, असे सांगत उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सरकारविरुध्द असंतोषाला वाचा फोडणयासाठी १ जुलैला मुंबई महापालिकेवर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली.
(हेही वाचा – पालिका अधिकारी मारहाण प्रकरण : अनिल परब यांना ४ जुलै पर्यंत दिलासा)
विशेष म्हणजे मुंबई महापालिकेला शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळे शनिवार आणि रविवारी महापालिका कार्यालर्यालयांसह मुख्यालय बंद असते. त्यामुळे या सुट्टीच्या दिवशी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढून उबाठा शिवसेना नक्की काय साध्य करणार आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. उबाठा शिवसेनेने या मोर्चासाठी शनिवारचाच दिवस का निवडला हा आता सर्वांच्याच संशोधनाचा भाग बनला असून ज्या दिवशी महापालिकाच बंद असते, त्या बंद असलेल्या महापालिकेच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन उबाठा शिवसेना केवळ मोर्चा काढून आपली ताकद दाखवण्याचा आणि शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेनेची १९८५ साली प्रथम सत्ता आली आणि या कालावधीतच मुदतवाढ मिळाल्याने १९९२ पर्यंत सत्ता राहिली. परंतु त्यानंतर सत्ता पालट होऊन १९९२मध्ये काँग्रेसची सत्ता आली आणि ९७च्या आधी म्हणजे १९९६च्या महापौर निवडणुकीत काँग्रेसचे नगरसेवक फुटल्याने शिवसेनेचे मिलिंद वैद्य हे महापौर बनले. त्यानंतर १९९७ पासून सलग २५ वर्षे शिवसेना भाजपकडे सत्ता असून मागील पाच वर्षे वगळता २० वर्षे या महापालिकेवर शिवसेना भाजपनेच राज्य केले. परंतु बऱ्याच वेळा भाजपने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असला तरी शिवसेनेने कधीही महापालिका कार्यालय किंवा मुख्यालयावर मोर्चा काढला नाही. उलट महापालिकेवर काढल्या जाणाऱ्या मोर्च्याला जोख उत्तर देण्याचे काम प्रशासनासोबत सत्ताधारी पक्षाने केले होते. १९८५ पूर्वी महापालिका विभाग कार्यालयावर पाणी, कचरा तसेच इतर मुद्द्यासाठी आंदोलन मोर्चा काढण्यात आले. सरकार विरोधात आजवर अनेक मोर्चा आणि आंदोलने करण्यात आली असली तरी महापालिकेच्या विरोधात कधी असा मोर्चा काढण्याची वेळ आली नव्हती.
पण महापालिकेत ज्या प्रशासकांची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री आणि तत्कालीन पालकमंत्री यांनी पुढाकार घेत केली त्याच प्रशासकाच्या कारभाराचे वाभाडे त्यांच्याच पक्ष काढणार आहे आणि त्याचे नेतृत्व आदित्य ठाकरे हे करणार आहेत. पण आपण नेमलेल्या प्रशासकाच्या टार्गेट करता येत नसल्याने ते आता राज्य सरकारला टार्गेट करणार आहेत.
मात्र, शनिवारी पालिका मुख्यालय बंद असल्याने ज्या दिवशी पर्यटक मुख्यालय इमारतीत येतात त्याच दिवशी आदित्य ठाकरे हे मोर्चा घेऊन येत असल्याने ते मुख्यालय इमारतीत हेरिटेज वॉक करता सर्वाना घेऊन येतात का असा मिश्किल सवाल महापालिका कर्मचाऱ्यांसह लोकांकडून केला जात आहे. आदित्य ठाकरे यांच्या पुढाकराने हेरिटेज वॉक सुरू झाल्याने यासाठी नियुक्त केलेल्या खाकी संस्थेने, एवढ्या मोठयाप्रमाणात येणाऱ्या लोकांचे नियोजन करावे आण त्याचे पैसेही त्यांनी महापालिकेला दयावे असेही मिश्किलपणे बोलले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community