गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागांमधील (Meteorology Department) हवामानात बदल झाला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे वातावरणात झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. गेल्या ३-४ दिवसांपासून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच जळगाव, नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उद्यापासून (बुधवार) पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बुधवारनंतर पुन्हा एकदा थंडी वाढण्याची शक्यता आहे.
यलो अलर्ट
मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड व विदर्भातील अकोला, अमरावती आदी जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे.
हवामान विभागाने सांगितले पावसाचे कारण…
नैऋत्य अरबी समुद्रापासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्याच वेळी कमी दाबाच्या हवेचा पट्टा सक्रिय असल्याने पावसाला पोषक हवामान तयार होत आहे.