कोविड काळात देशातील सर्व व्यवहार ठप्प झालेले असताना, मद्यपींचा लिव्हर खवळणे मात्र बंद झालेले नव्हते. स्वतःला कोविड योद्धे म्हणवून घेणा-या राज्यातील तळीरामांनी कोविड काळात कोट्यवधी लिटरची दारू रिचवल्याची माहिती मिळत आहे. मागील दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत 2021-22 या आर्थिक वर्षात मद्यपींनी सर्वात जास्त विदेशी दारू रिचवली आहे. तर देशी दारू पिणा-यांची संख्या राज्यात सर्वात जास्त असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
23.58 कोटी लिटर विदेशी दारू विक्री
2021-22 या आर्थिक वर्षात राज्यात तब्बल 23.58 कोटी लिटर विदेशी दारुची विक्री झाली आहे. देशी दारु पिणा-यांची संख्या राज्यात जास्त आहे तर बिअरप्रेमींची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे समजत आहे. गेल्या दहा वर्षांत राज्यातील वाईन विक्री वधारली असल्याचे देखील आकड्यांवरुन स्पष्ट होत आहे. या आर्थिक वर्षात 34.83 कोटी लिटर देशी दारू, 23.58 कोटी लिटर विदेशी दारू, 23.13 कोटी लिटर बिअर, तर 0.86 कोटी लिटरची वाईन विक्री झाली आहे.
(हेही वाचाः दोन वर्षांत लोकलमधील चोरटे झाले कोट्यधीश)
34 हजार जणांवर कारवाई
2021-22 या आर्थिक वर्षात मद्य तस्करी, बनावट मद्याचे उत्पादन, विनापरवाना मद्यविक्री यांसारख्या प्रकरणांत तब्बल 34 हजार 849 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे 48 हजार 750 गुन्हे दाखल करण्यात आले होते.
मद्यविक्रीपेक्षा वसुलीतून महसूल
गेल्या दहा वर्षांत राज्यात कायदेशीररित्या मद्यविक्रीतून मिळणा-या महसुलापेक्षा बेकायदेशीररित्या होणा-या मद्यविक्रीवर केलेल्या कारवाईतून अधिक महसूल मिळाला आहे. 2012-13 या आर्थिक वर्षात 80.55 कोटी लिटरची मद्यविक्री झाली तर 9 हजार 297 कोटी रुपये महसूल राज्याच्या तिजोरीत जमा झाला. 2021-22 या आर्थिक वर्षात 82.4 कोटी लिटर दारू विकली गेली असून, 17 हजार 177 कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळाला. या तुलनेत दंडात्मक कारवाई करुन मिळालेला महसूल हा जास्त असल्याचे कळत आहे.
(हेही वाचाः कोरोनाचा कुठलाही येऊ दे अवतार, बेस्ट कर्मचारी सुरक्षितच राहणार)
Join Our WhatsApp Community