माहिम प्रसुतीगृहाला माजी नगरसेविका इंदुमती माणगावकर यांचेच नाव? आरोग्य समितीचा शिक्कामोर्तब

120

मुंबई महापालिकेच्या माहिममधील प्रसुतीगृहाच्या नामकरणावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात जुंपलेली असताना शुक्रवारी पार पडलेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत या प्रसुतीगृहाला माजी नगरसेविका इंदुमती माणगावकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करून आरोग्य समितीने प्रशासनाच्या अभिप्रायसाठी पाठवून दिला आहे. तर भाजप नगरसेविकेच्या नामकरणाचा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला आहे.

नावाचा प्रस्ताव समिती अध्यक्ष राजुल पटेल यांनी राखून ठेवला

माहिममधील प्रभाग क्रमांक १९०मधील प्रसुतीगृहाचे नामकरण स्थानिक भाजप नगरसेविका शीतल गंभीर यांनी अनाथांची माता सिंधुताई सकपाळ यांचे नाव ठेवण्याची मागणी केली होती. तर शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी या प्रसुतीगृहाला शिवसेनेच्या माजी नगरसेविका इंदुमती माणगावकर मायांचे नाव देण्याची मागणी आरोग्य समिती अध्यक्षांकडे पत्राद्वारे केली आहे. सरवणकर यांनी २३ डिसेंबर २०२१ रोजी आरोग्य समितीला पत्र दिले होते, तर स्थानिक नगरसेविका शीतल गंभीर यांनी १७ जानेवारी २०२२ रोजी आरोग्य समितीला पत्र लिहिले होते. त्यामुळे नामकरणाच्या या दोन्ही मागणीची पत्रे पटलावर ठेवण्यात आली होती. यामध्ये कार्यक्रम पत्रिकेवर आमदार सदा सरवणकर यांनी शिफारस केलेल्या इंदुमती माणगावकर यांच्या नावाचा प्रस्ताव पहिल्या क्रमांकावर होता, तर त्यानंतर शीतल गंभीर यांच्या मागणीचा प्रस्ताव होता. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या आरोग्य समितीच्या बैठकीत शिवसेना आमदारांनी शिफारस केलेल्या पत्राचा विषय मंजूर करण्यात आला आहे. तर गंभीर यांच्या नावाचा प्रस्ताव समिती अध्यक्ष राजुल पटेल यांनी राखून ठेवला आहे.

(हेही वाचा मुंबईतील कोणत्या प्रभागांमध्ये अनुसूचित जातीची किती लोकसंख्या? जाणून घ्या…)

इंदुमती माणगावकर यांची कारकीर्द

इंदुमती माणगावकर यांना सन १९९७ ते २००२ आणि २००२ ते २००२ ते २००७ या कालावधीत दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. माहिम प्रसुतीगृहाच्या दर्जोन्नतीसह तेथील सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी त्यांचा मोठा प्रयत्न होता. इंदुमती माणगावकर या माहिमधील शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जायच्या. विमानतळावरील आंदोलन असो वा कुठल्याही कार्यालयावर आंदोलन किंवा रस्त्यावर उतरुन विरोधकांवर चाल करण्याची वेळ असो. प्रत्येक ठिकाणी इंदुमती माणगावकर जातीने पुढे असायच्या. मालवणी भाषेतून समोरच्याला आपुलकीने हाक मारणाऱ्या इंदुमती माणगावकर यांचा जनसंपर्कही दांडगा होता. परंतु वृध्दापकाळात त्यांना एकाकी जीवन जगावे लागले. वृध्दाश्रमांत त्यांचे शेवटचे जीवन गेले. त्यामुळे जिवंतपणी उपेक्षित राहिलेल्या इंदुमती माणगावकर यांची मृत्यूनंतर नामकरणावरून उपेक्षाच होत आहे. त्यामुळे या प्रसुतीगृहाला माणगावकर यांचेच नाव योग्य असल्याची प्रतिक्रिया विभागांमधून व्यक्त होत होत्या. त्यातच आता आरोग्य समितीने हा प्रस्ताव मंजूर करून प्रशासनाच्या अभिप्रायासाठी पाठवला आहे. त्यामुळे याचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर पुढील मान्यतेचे सोपस्कार पार पाडत इंदुमती माणगावकर यांचे नाव देण्यात येईल, असे आरोग्य समिती सदस्य समाधान सरवणकर यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.