राज्यातील ‘या’ चार परिचारिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते झाला सन्मान

164

आरोग्य सेवेत योगदान दिल्याने सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यातील चार परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. सोलापूर येथील मनीषा जाधव, जळगाव येथील राजेश्री पाटील, पुण्यातील अलका कोरेकर आणि मुंबईच्या अंजली पटवर्धन या परिचारिकांचा दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात सन्मान करण्यात आला.

( हेही वाचा : ‘रेल नीर’ साठी पंधरा रुपयेच द्या! रेल्वेचे प्रवाशांना आवाहन)

अंजली पटवर्धन

अंजली पटवर्धन या मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात गेली ३९ वर्षे आरोग्य क्षेत्रात सेवा देत आहेत. त्या सध्या परळ येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात एंटरस्टोमेल थेअरपीच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत. युएसएमधून एंटरस्टोमल थेअरिस्ट म्हणून शिक्षण घेणा-या अंजली पटवर्धन या पहिल्या भारतीय परिचारिका आहेत. भारतात परतल्यानंतर त्यांनी देशात पहिल्यांदा स्टोमा थेरपी क्लिनिक आणि एंटरोस्टोमल थेरपी क्लिनिकची स्थापना केली. शरीरातील अनावश्यक घटक बाहेर जाण्यासाठी केल्या जाणा-या शस्त्रक्रियेला ओस्टोमी असे संबोधले जाते. या रुग्णांना सांभाळण्यात अंजली पटवर्धन यांनी हातखंडा आहे. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित त्यांनी अनेक पेपर्स राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर केले आहेत.

राजेश्री पाटील

जळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात, आरोग्य दाता (हेल्थ व्हिजिटर) या पदावर राजेश्री पाटील कार्यरत आहेत. त्यांना २२ वर्षांचा कामाचा अनुभव आहे. राजेश्री पाटील केंद्राच्या विविध आरोग्यविषयासंबंधित उपक्रमांमध्ये सहभागी आहेत. परिचारिका शिक्षण कार्यक्रमात त्या जातीने हजेरी लावतात. आरोग्य क्षेत्रात सातत्याने होणा-या बदलांबाबत विविध आजारांबात त्या जागरुकतेने माहिती घेऊन प्रचाराचे काम करतात. राज्य आणि जिल्हा पातळीवर त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत.

अलका कोरेकर

अलका कोरेकर या पुण्यातील राज्य कुटुंब कल्याण विभागातील आरोग्य सेवा संचालक विभागात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. अलका कोरेकर गेल्या ३० वर्षांपासून परिचारिका म्हणून राज्य आरोग्य क्षेत्रात सेवा देत आहेत. १९८९ साली रायगड जिल्हयातील पूरपरिस्थितीत तसेच लातूर येथील भूकंपग्रस्तांना त्यांनी घटनास्थळी पोहोचून सेवा दिली. लसीकरण साठवणूक प्रक्रिया ते गर्भवती महिला, नवजात बालकांना हाताळण्याचे शिक्षण त्यांनी घेतले आहे. २०१८ साली युनिसेफकडून त्यांना लसीकरण व्यवस्थापनासाठी ‘अ’ श्रेणी मिळाली.

मनीषा जाधव

मनीषा जाधव यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यात सहभाग घेतला आहे. माता व शिशू आरोग्य, कुटुंब कल्याण तसेच क्षयरोग रुग्णांना हाताळण्यात त्यांचा अनुभव आहे. तसेच कौशल्य विकास कार्यक्रम तसेच परिचारिका प्रशिक्षण कार्यक्रमातही राज्य आणि जिल्हा पातळीवरही त्यांनी सहभाग नोंदवला आहे. जिल्हा आणि राज्य पातळीवरही त्यांना पुरस्कार मिळाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.