कोकण टूर सर्किटमधून डिसेंबरमध्ये चार मोफत सहली; येथे करा नोंदणी

176

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कोकण टूर सर्किटमधून येत्या डिसेंबरमध्ये चार मोफत सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागीय कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली.

( हेही वाचा : राज्यात ७५ हजार तरुणांना नोकरीची संधी; ‘या’ महिन्यात निघणार जाहिरात)

संविधान दिनाचे औचित्य साधून पर्यटनवाढीसाठी टूर सर्किटचा प्रारंभ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला. या टूर सर्किटमध्ये विभागनिहाय मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यांमधील पर्यटनस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने कोकण विभागातून टूर सर्किटकरिता महाड येथील चवदार तळे आणि गांधारपाले बौद्ध लेणी या ऐतिहासिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. पर्यटन संचालनालयामार्फत टूर सर्किटद्वारे येत्या ३ आणि ४ तसेच ७ आणि ८ डिसेंबर रोजी सहल आयोजित करण्यात आली आहे. ही एकदिवसीय सहल असून यासाठी पर्यटकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

या सहलीमध्ये पर्यटकांसाठी बससेवा, गाइड, अल्पोपाहार, दुपारचे जेवण, पिण्याचे पाणी या सर्व सुविधा नि:शुल्क पुरविण्यात येणार आहेत. “प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा प्राधान्य” या शर्तीवर सहलीचे आरक्षण स्वीकारण्यात येणार असून ३ आणि ४ डिसेंबरच्या सहलीचे आगाऊ आरक्षण १ डिसेंबरपर्यंत, तर ७ आणि ८ डिसेंबरच्या सहलीचे आगाऊ आरक्षण ५ डिसेंबरपर्यंत करणे अनिवार्य आहे.

या ठिकाणी करा नोंदणी

आगाऊ आरक्षणासाठी तसेच सहली संदर्भात अधिक माहितीसाठी 9930359384 किंवा 9421051708 या क्रमांकांवर तसेच [email protected] या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा. या सहलींसाठीच्या बसेस सीबीडी, बेलापूर/कोकण भवन (नवी मुंबई) या बसस्थानकांवरून नियोजित वेळेवर सोडण्यात येणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनसंघर्ष आणि त्यांनी केलेल्या कार्याची माहिती मिळविण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत कृ. हेडे यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.