आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने चार बस स्थानकांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती पंढरपूर आगार व्यवस्थापक सुधीर सुतार यांनी दिली. प्रामुख्याने यात्रा स्पेशल गाड्या चार बस स्थानकातून ६ ते १४ जुलै या कालावधीत सुटतील. तर पंढरपूरमधील बस स्थानकातून ९ ते ११ जुलै या तीन दिवसांसाठी वाहतूक पूर्णतः बंद राहील.
( हेही वाचा : रेल्वे प्रवाशांना दिलासा! १५ डबा लोकलच्या २७ फेऱ्या वाढवण्याचे नियोजन)
विविध सोयी-सुविधा
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पूर्ती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चार तात्पूर्ती बस स्थानके
चंद्रभागानगर बस स्थानक या ठिकाणाहून पुणे, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सांगली व अकलूजकडे जाणारी वाहतूक होणार आहे.
रत्नागिरी कराड मार्गे चिपळूण, खेड, दापोली, मंडनगड व गुहागर तर सांगली, आटपाडी, तासगाव, विटा, पलूस या गाड्यांची वाहतूक चंद्रभागानगर बसस्थानकातून होत आहे.
सांगोला रोड आयटीआय कॉलेज पांडुरंग बसस्थानक या ठिकाणाहून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सांगोला व रत्नागिरी विभागाच्या बस गाड्या धावणार आहेत.