उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये एक दुर्दैवी आणि चमत्कारिक घटना घडली आहे. चहा प्यायल्याने एकाच कुटुंबातील दोन लहानग्यांसह एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत असून प्राथमिक अंदाजानुसार धक्कादायक माहिती समोर येत आहे.
काय झाले नेमके?
मैनपुरीमधील नगला कन्हैया गावातील शिवनंदन यांच्या घरी सकाळी भाऊबीजेची तयारी सुरू होती. यावेळी त्यांच्या घरी फिरोजाबाद येथील रविंद्र सिंह त्यांच्या घरी आले. संध्याकाळी घरातील सर्वजण चहा प्यायला बसले. चहा प्यायल्यानंतर रवींद्र सिंह यांची तब्येत अचानक बिघडली आणि ते चक्कर येऊन खाली पडले. त्याचवेळी शिवनंदन यांचा सहा वर्षांचा मुलगा शिवांग आणि पाच वर्षांचा मुलगा दिव्यांश यांचीही प्रकृती बिघडली. तसेच शिवनंदन आणि सोबरन सिंह यांना देखील त्रास होऊ लागल्याने सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले.
(हेही वाचाः भावाने बॉम्ब फोडला बहिणीने प्राण गमावला, भाऊबीजेच्या दिवशीच घडली दुर्दैवी घटना)
चहामध्ये होते काय?
रुग्णालयातील डॉक्टरांनी रविंद्र सिंह, शिवांग आणि दिव्यांश या दोन्ही भावंडांना मृत घोषित केले. तर शिवनंदन आणि सोबरन सिंह यांची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना तातडीने सैफई रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारांदरम्यान सोबरन यांचा मृत्यू झाला असून शिवनंदन यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घाटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत असून चहामध्ये चहा पावडरऐवजी चुकून कीटकनाशक वापरल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना वर्तवला आहे.
Join Our WhatsApp Community