विदर्भातील चंद्रपुरात वाढत्या मानव-वाघ संघर्षावर उपाययोजना म्हणून वाघांना रेडिओ कॉलरिंग करुन वनविभागात सोडण्यात येते. वनविभागाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पावसाळ्यानंतरचा नवा मुहूर्त मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प येथे आता चार वाघीण रेडिओ कॉलरिंग करुन जंगलात मुक्त संचारासाठी सोडल्या जाणार आहेत. सुरुवातीला दोन वाघीण रेडिओ कॉलरिंग करुन जून महिन्यात नवेगाव नागझिरा येथे मुक्त अधिवासात सोडल्या जाणार होत्या. मात्र आता पावसाळ्यानंतर प्रत्यक्षात चारही वाघिणींचे नवेगाव नागझिरा येथे आगमन होईल, अशी माहिती वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी दिली.
चार वाघिणींचा शोध वनविभागाने लावला
विदर्भातील वाढती वाघांची संख्या, मानवी वस्तीवर वाघांचे हल्ले यांवर उपाययोजना म्हणून वर्षाच्या सुरुवातीला वाघांना दुस-या जंगलात हलवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला होता. सुरुवातीला दोन वाघ सोडण्याची वनविभागाची योजना होती. देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून दोन वाघांना रेडिओ कॉलर करुन नवेगाव नागझिरा येथे सोडण्याचे ठरले. या कामासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचीही मान्यता मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मे महिन्यात रेडिओ कॉलरिंग वाघांवर पाळत ठेवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांनी नवेगाव-नागझिराला भेट देत वनाधिका-यांना प्रशिक्षण दिले, असे सूत्रांकडून समजले. नवेगाव येथे दोन आणि नागझिरा येथे दोन वाघीण रेडिओ कॉलर करुन थेट जंगलात सोडले जातील, या चार वाघिणींचा शोध वनविभागाने लावला आहे. चारही वाघिणींना एवढ्यात पकडून जेरबंद केले जाणार नाही. रेडिओ कॉलरिंग केल्यानंतर नवेगाव नागझिरा येथे त्यांना थेट सोडले जाईल, अशी माहितीही प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी दिली.
(हेही वाचा आता पश्चिम बंगालमध्ये ‘शिंदे पॅटर्न’?)
नवेगाव नागझिरा येथील सद्यस्थितीतील वाघांची संख्या
सध्या नवेगाव नागझिरा येथे १० वाघीण आणि ३ वाघ आहेत. तसेच आठ वाघांचे बछडेही जंगलात बागडताना वनाधिका-यांना दिसून आले आहेत. यांसह नजीकच्या भागांतूनही वाघांचे येणे-जाणे नवेगाव नागझिरा येथे सुरुच असते.
Join Our WhatsApp Community