मुंबई : १६१ कोटी रूपयांच्या बनावट देयकांद्वारे २९.०१ कोटी रुपयांची चुकीची कर वजावट घेऊन शासनाचा महसूल बुडविणाऱ्या एकास महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने अटक केली. रामचंद्र प्रधान असे या व्यक्तीचे नाव असून, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
( हेही वाचा : वृद्ध दाम्पत्याकडून सुसाईड नोट लिहून घेत घातपात करण्याचा प्रयत्न )
शासनाची महसूल हानी
बोगस देयकांद्वारे शासनाचा महसूल बुडविणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत मे. सनशाईन ट्रेडर्स या कंपनीवर अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. कारवाई दरम्यान या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून मालाची वास्तविक खरेदी न करता ६९.९९ कोटी रुपयांच्या केवळ खोट्या बिलाद्वारे १२.५९ कोटी रुपयांची चुकीची कर वजावट घेऊन शासनाचा महसूल बुडविल्याचे निदर्शनास आले. तसेच, मालाची वास्तविक विक्री न करता ९१,२५ कोटी रुपयांच्या खोट्या देयकांद्वारे १६.४२ कोटी रुपयांची चुकीची कर वजावट निर्गमित करून शासनाची महसूल हानी केल्याचे आढळले.
१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
दरम्यान, महानगर दंडाधिकाऱ्यांनी आरोपी रामचंद्र प्रधान याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राज्यकर सहआयुक्त अन्वेषण- अ (मुंबई) राहुल द्विवेदी, राज्यकर उपायुक्त राजेंद्र टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक राज्यकर आयुक्त नामदेव मानकर, संजय शेटे व अनिल पांढरे यांनी ही कारवाई केली.
Join Our WhatsApp Community