केईएममधील ‘त्या’ ट्रस्टमध्ये लूट! लेखापाल आणि लिपिकांविरोधात गुन्हा दाखल

या संस्थेत काम करणारे एक लेखापाल व एक लिपिक यांनी गेल्या काही वर्षांत खोटी कागदपत्रे तयार करुन, या संस्थेचा निधी अन्यत्र वळवला.

108

मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील केईएम रुग्णालयास ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १९९१च्या सुमारास तत्कालीन प्राध्यापक-शिक्षक व माजी विद्यार्थी मंडळींच्या पुढाकाराने ‘डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट’ या नावाने एका स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेद्वारे प्रामुख्याने वैद्यकीय संशोधन व अनुषांगिक सहकार्य करण्याचे कार्य केले जाते. तसेच  या संस्था पूर्णपणे स्वायत्त असून, ती मुंबई महापालिका किंवा केईएम रुग्णालयाच्या अखत्यारित नाही. या स्वायत्त संस्थेच्या निधीमध्ये संस्थेचे कंत्राटी कर्मचारी असणाऱ्यांनी अपहार(गैरव्यवहार) केल्याचे निदर्शनास आले असून, या अनुषंगाने एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे मानद अध्यक्ष व केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख यांनी दिली आहे.

पूर्णपणे स्वायत्त संस्था

या स्वायत्त संस्थेच्या अनुषंगाने अधिक माहिती देताना डॉक्टर देशमुख यांनी सांगितले की, डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट’ च्या विश्वस्त मंडळावरील सर्व व्यक्ती या मानद ‘विश्वस्त’ असून, त्या स्वयंसेवी पद्धतीने या संस्थेचे काम बघतात. परंतु या संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी काही कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर संस्थेमध्ये कार्यरत आहेत. या स्वायत्त संस्थेच्या अनुषंगाने महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या स्वायत्त संस्थेच्या कामांसाठी महापालिकेचा किंवा केईएम रुग्णालयाचा कोणताही निधी उपयोगात आणला जात नाही. संस्थेला मिळणाऱ्या देणग्यांमधून या संस्थेचे कामकाज चालते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या व प्रशासकीय दृष्ट्या ‘डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट’ ही पूर्णपणे स्वायत्त संस्था आहे.

(हेही वाचाः बीकेसी कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ! मनसेने केली मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी)

दोघांविरुद्ध तक्रार

या संस्थेत काम करणारे एक लेखापाल व एक लिपिक यांनी गेल्या काही वर्षांत खोटी कागदपत्रे तयार करुन, या संस्थेचा निधी अन्यत्र वळवला. या अनुषंगाने या संस्थेचे मानद अध्यक्ष तथा केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख यांनी भोईवाडा पोलिस स्टेशन मध्ये संबंधित लेखापाल श्रीपाद देसाई व लिपिक राजन राऊळ यांच्या विरोधात रितसर एफआयआर करत तक्रार दाखल केली आहे.

संस्थेच्या कामावर कोणताही परिणाम नाही

या दोन्ही कर्मचाऱ्यांना ट्रस्टच्या कामातून यापूर्वीच काढून टाकण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांच्या स्तरावर योग्य ती चौकशी व तपास करण्यात येत आहे. त्याचबरोबर गेल्या साधारणपणे बारा वर्षांच्या कालावधीत करण्यात आलेल्या अपहारामुळे संस्थेच्या संशोधकीय कामांवर कोणताही प्रतिकूल परिणाम झाला नसल्याचा निर्वाळा डॉक्टर हेमंत देशमुख यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.