मनसुख हिरेन यांची फसवून हत्या! नातलगांचा आरोप 

मनसुख यांची पाण्यात बुडवून हत्या करण्यात आल्याचा आरोप मनसुख यांचा मोठा भाऊ विनोद हिरेन यांनी केला आहे. तसेच त्यांच्या मित्रपरिवारांनीदेखील ही आत्महत्या नसून घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा मालक मनसुख हिरेन यांचा बुडून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार मनसुख यांच्या शरीराला कुठल्याही जखमा नसून मृत्यूचे कारण स्पष्ट होत नाही, असे म्हटले आहे. याबाबत शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल राखून ठेवला असून त्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान मनसुख यांची पाण्यात बुडवून हत्या करण्यात आल्याचा आरोप मनसुख यांचा मोठा भाऊ विनोद हिरेन यांनी केला आहे. तसेच त्यांच्या मित्रपरिवारांनीदेखील ही आत्महत्या नसून घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

पोलिसांनी शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल वाचल्यावर झाले अंत्यसंस्कार!

मनसुख हिरेन हे गुरुवारी रात्री घरातून बाहेर पडल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडी येथे मिळून आला होता. मनसुख यांच्या तोंडात हात रुमाल कोंबण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. शनिवारी मुंब्रा पोलिसांच्या हाती पडलेल्या प्राथमिक अहवालात मनसुख यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या मारल्याच्या खुणा आढळून आलेल्या नसून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होत नसून अंतिम अहवाल राखून ठेवण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनसुख यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंब्रा पोलिसांनी शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल मनसुख यांच्या कुटुंबियांना वाचून दाखवून त्यांना मृतदेह ताब्यात घेण्याचा आग्रह करण्यात आला. दरम्यान मनसुख यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास होकार देत सायंकाळी उशिरा मनसुख यांचा मृतदेह ताब्यात घेऊन ठाण्यातील जवाहर स्म्शानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

(हेही वाचा : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : महाराष्ट्रात विनाशक आघाडी! भाजपचा हल्लाबोल )

पाण्यात बुडवून ठार मारल्याचा भावाचा आरोप!

मनसुख पट्टीचा पोहणारा होता, त्यांचा बुडून मृत्यू होऊच शकत नाही. त्यांची हत्या करून मृतदेह पाण्यात फेकला असल्याचा संशय मनसुख यांचे मोठे भाऊ विनोद यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी योग्य तपास करून आम्हाला न्याय द्यावा, असे विनोद यांनी म्हटले आहे. मनसुख त्यांच्या विकास पाम या इमारतीजवळ हजारोच्या संख्येने नातलग, मित्रमंडळी आणि व्यापारी जमा झाले होते, प्रत्येकाच्या तोंडी मनसुख आत्महत्या करूच शकत नाही त्याची हत्या करण्यात आली हेच होते. मनसुखला फसवून घराबाहेर बोलावले आणि त्याची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप मनसुख यांच्या जवळच्या मित्रांनी केला आहे.

ती मोटार मनसुख यांची नव्हती!

मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर मिळालेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ मोटार ही मनसुख हिरेन यांच्या नावावर नव्हती. ती मोटार सॅम न्यूटल या व्यक्तीच्या नावावर होती. मनसुख हे कार इंटीरियर डिझायनर असल्यामुळे सदर स्कॉर्पिओ मोटार ही मागील तीन वर्षांपासून मनसुख यांच्याजवळ होती, अशी माहिती मनसुख यांचे भाऊ विनोद यांनी दिली. कार चोरीला गेली होती आणि रीतसर विक्रोळी पोलीस ठाण्यात त्यांची तक्रार देखील दाखल करण्यात आली होती, असे विनोद यांनी म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here