मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये पुढच्या महिन्यांपासून बेडरोलची सुविधा मोफत मिळणार आहे. २६ फेब्रुवारीपासून प्रवाशांना मोफत बेडरोलची सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वेच्या गाड्यांमध्ये बेडरोलसाठी अतिरिक्त पैसे आकारले जात नाहीत. फक्त दुरांतो एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांकडून बेडरोलसाठी अतिरिक्त २५० रुपये घेण्यात येतात यामुळे प्रवाशांमध्येही प्रचंड नाराजी होती. या संदर्भात अनेक रेल्वे संघटना तसेच प्रवासी संघटनांनीही रेल्वे बोर्ड आणि रेल्वे मंत्रालयाकडेही तक्रारी केल्या आहेत. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींमुळे आता २६ फेब्रुवारीपासून दुरांतो एक्स्प्रेस गाड्यांमध्येही प्रवाशांना मोफत बेडरोल मिळण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा : २०२४ ला सुधीर मुनगंटीवार केंद्रात जाणार? )
सुरू होता पायलट प्रोजेक्ट
मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमध्ये देण्यात येणार पेड बेडरोल हा रेल्वेचा पायलट प्रोजेक्ट होता. परंतु एकूणच या प्रकल्पाचे परिणाम लक्षात घेऊन रेल्वे पेड बेडरोल हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. करार संपल्यानंतर दुरांतो एक्स्प्रेसमध्येही प्रवाशांना मोफत बेडरोल देण्यात येणार आहे.
दरम्यान प्रवाशांना सर्व थर्ड एसी कोचमध्ये बेडरोल सुविधा मिळणार आहे. कोरोना महामारीमुळे रेल्वे मंत्रालयाने ट्रेनमध्ये बेडरोलची सुविधा बंद केली होती. परंतु आता रेल्वेने पुन्हा प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याची घोषणा केली आहे. ज्या डब्यांमध्ये आतापर्यंत बेडरोल उपलब्ध नव्हते, त्या डब्यांमध्येही आता प्रवाशांना बेडरोलची सुविधा मिळणार असल्याचे रेल्वेने सांगितले.
Join Our WhatsApp Community