मुंबई महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयाच्या (KEM Hospital) बाह्य रुग्ण विभागात आता मधुमेहांसाठी खास सोय उपलब्ध करण्यात आली आहे. मधुमेह टाईप १ असलेल्या रुग्णांना मोफत इन्सुलिन केईएम रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. येत्या आठवड्याभरात ही सुविधा उपलब्ध होईल. मोफत इन्सुलिन देणारे केईएम हे पालिकेचे एकमेव रुग्णालय आहे.
अगोदरच एक हजार युनिट इन्सुलिन केईएम रुग्णालयात (KEM Hospital) मागवण्यात आले आहेत. इन्सुलिनची साठवणूक करण्यासाठी फ्रीजची सोय करण्यात आली आहे. हे इन्सुलिन घेण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नसून लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच इन्सुलिन दिले जाईल. याचा सर्व खर्च पालिका उचलणार आहे. इन्सुलिन उपलब्ध होण्यासाठी अगोदरच ५०० टाईप वन मधुमेह ग्रस्त रुग्णांनी केईएम रुग्णालयात नोंदणी केली आहे. भविष्यात टाईप टू मधुमेहग्रस्तांना देखील इन्सुलिन मोफत उपलब्ध करून दिली जाईल असे केईएम रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.
(हेही वाचा – Hair Health : केसांच्या आरोग्यासाठी जाहिरातींना भुरळू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या)
केईएम रुग्णालयाच्या (KEM Hospital) एंडोक्राइनोलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर तुषार बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या मधुमेहग्रस्त रुग्णांना आम्ही टाईप वनचे मोफत इन्सुलिन देतो आता लवकरच आम्ही बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या मधुमेहग्रस्त रुग्णांनाही मोफत इन्सुलिन देणार आहोत. त्यामुळे रुग्णांचा आर्थिक भार कमी होईल अशी आशा केईएम रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली.
किशोरवयीन मुलांमध्ये वाढते टाईप वन मधुमेहाचे प्रमाण
केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान वयातील आणि किशोरवयीन मुलांमध्ये आता टाईप वन मधुमेहग्रस्ताचे प्रमाण वाढू लागले आहे. २०२२ वर्षात देशात टाईप वन मधुमेहग्रस्तांची ९५ हजार ६००केसेस आढळून आल्या आहेत. हे सर्व रुग्ण १४ वयोगटांपेक्षाही लहान वयाचे होते. टाईप वन मधुमेह असलेल्या मुलांना फार जपावे लागते. त्यांच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी दिवसातून किमान तीन ते चार वेळा तपासावी लागते. रुग्णांच्या शरीरात साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी ०.५ ते एक युनिट इन्सुलिन दिले जाते. २० ते ३० किलो वजनाच्या मुलाला किमान दहा ते पंधरा युनिट्स इन्सुलिन लागते. या मुलांसाठी पालकांना इन्सुलिनसाठी हजार ते दीड हजार रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे के एम रुग्णालयात मोफत इन्सुलिन उपलब्ध झाल्यास लहान मुलांच्या पालकांचा आर्थिक भार कमी होईल अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली.
मधुमेह टाईप वनची लक्षणे
- वारंवार लघवीला होणे
- अशक्तपणा जाणवणे
- चिडचिड होणे
- वजन कमी होणे
- सतत तहान आणि भूक लागणे