पूर बचाव आणि प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण घेण्याची मोफत संधी; करा महापालिकेशी संपर्क

75

केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार १८ ते ४० वयोगटातील मुंबईकर नागरिकांसाठी ‘आपदा मित्र’ हा १२ दिवसांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात सुरु करण्यात येत आहे.प्रशिक्षण कार्यक्रमा दरम्यान निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून आपत्ती व्‍यवस्‍थापनाचे धडे प्रात्यक्षिकांसह देण्यात येतील. यामध्ये पूर बचाव, शोध व बचावकार्य, प्रथमोपचार, सीपीआर, प्राथमिक अग्निशमन इत्‍यादीचे प्रात्‍याक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येणार आहे.निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण स्थळी ये-जा करण्‍याकरिता दैनंदिन १५० रुपये इतका भत्ता देण्यात येणार आहे.

बारा दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात येणारे हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना आपत्कालीन व्यवस्थापन खात्याच्या प्रमुख रश्मी लोखंडे यांनी सांगितले की, भारत सरकारचे राष्‍ट्रीय आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील राज्‍य आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण यांच्‍या निर्देशांनुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्‍हा या २ जिल्ह्यांच्या आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणांमार्फत मुंबईतील रहिवाशी असणा-या नागरिकांना सहभागी होता येईल, असा ‘आपदा मित्र’ हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे. १२ दिवसांचा हा प्रशिक्षण कार्यक्रम (रविवार वगळून) आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन विभागाच्‍या परळ येथील आपत्ती व्‍यवस्‍थापन प्रशिक्षण केंद्रात सुरु करण्‍यात येत आहे.

(हेही वाचा विना परवानगी कूपनलिका खोदल्यास होणार कठोर कायदेशीर कारवाई)

सातवी उत्तीर्णही करू शकतात अर्ज

आपत्कालीन परिस्थितीत प्रशिक्षण प्राप्‍त असलेल्या प्रशिक्षित नागरिकांची गरजूंना मदत व्हावी आणि संभाव्य जीवित व वित्तहानी कमीतकमी व्हावी, या प्रमुख उद्देशाने हे प्रशिक्षण सुरु करण्यात येत आहे. या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई शहर व मुंबई उपनगरातील प्रत्‍येकी ५०० याप्रमाणे एकूण १००० नागरिकांना प्रशिक्षित करण्‍यात येणार आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमात वय वर्षे १८ ते ४० या वयोगटातील किमान ७ वी उत्तीर्ण असलेले मुंबईचे रहिवाशी अर्ज करु शकतात.

फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक…

तथापि, संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेले, वैद्यकीय व्यवसायिक आणि स्थापत्य अभियंता यांच्यासाठी वयाचे निकष शिथिल केले जाऊ शकतात. या प्रशिक्षणासाठी अर्ज करणा-या व्यक्तिंचे शारिरीक, मानसिक व वैद्यकीय आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक ते फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. तसेच आपत्ती प्रतिसाद कार्यात स्वंयसेवा करण्याचा पूर्वानुभव असलेल्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल.

येण्या जाण्यासाठी प्रशिक्षणार्थींना १५० रुपये भत्ता

या प्रशिक्षण कार्यक्रमा दरम्यान निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून आपत्ती व्‍यवस्‍थापनाचे धडे प्रात्यक्षिकांसह देण्यात येतील. यामध्ये पूर बचाव, शोध व बचावकार्य, प्रथमोपचार, सीपीआर, प्राथमिक अग्निशमन इत्‍यादीचे प्रात्‍याक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण स्थळी ये-जा करण्‍याकरिता दैनंदिन १५० रुपये इतका भत्ता देण्यात येईल. त्याचबरोबर प्रशिक्षणा दरम्‍यान प्रशिक्षणार्थींच्‍या चहा व भोजनाची व्‍यवस्‍था करण्यात येईल. १२ दिवसांचे प्रशिक्षण (रविवार वगळून) यशस्‍वीरित्‍या पूर्ण केल्‍यानंतर आपदा मित्र प्रमाणपत्र व ओळखपत्र देखील प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

या कागदपत्रांची आवश्यकता…

या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणा-या नागरिकांनी अर्जासोबत त्यांचे रहिवाशीत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल. उदा. आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, नजिकच्या काळातील विद्युत देयक इत्यादी. या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणा-यांनी कृपया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन विभागाशी ०२२ -२२६९४७२५ ते २७ या संपर्क क्रमांकांवर अथवा co.dm@mcgm.gov.in या ई मेल पत्त्यावर संपर्क साधावा. तसेच कृपया नोंद घ्यावी की, “आपदा मित्र” प्रशिक्षण हे मुंबई महानगरपालिकेत कोणत्‍याही प्रकारची नोकरी मिळण्‍याकरिता नसेल हे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.