स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून ठाणे शहराच्या हद्दीत राहणाऱ्या 75 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सेवेचा लाभ 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना घ्यावा असे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा व परिवहन समिती सभापती विलास जोशी यांनी केले आहे.
(हेही वाचा – देशभरातील तब्बल ६० तिरूपती मंदिरं ‘या’ दिवशी राहणार बंद! काय आहे कारण?)
या सवलतीचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी बी-कॅबिन पास केंद्र, कळवा आगार, वागळे आगार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुल्लाबाग) आगार, आनंदनगर आगार, ठाणे स्थानक येथे अर्ज उपलब्ध करुन देण्यात येतील. हे अर्ज पूर्णपणे भरुन त्या अर्जासोबत दोन फोटो, पॅनकार्ड, आधारकार्ड/ रेशनकार्ड, वास्तव्याचा दाखल इत्यादी कागदपत्रे जोडून सदरचा अर्ज सादर करावयाचा आहे.
कागदपत्रांची पुर्तता झाल्याची खातरजमा केल्यानंतर संबंधितांस मोफत प्रवासाचे ओळखपत्र वितरीत करण्यात येणार आहे. हे ओळखपत्र तीन वर्षे कालावधीसाठी असून, त्याकरिता सेवाआकार शुल्क 27 रुपये आकारण्यात येईल. तरी ठाणे शहरातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन सेवेच्यावतीने करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community