म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर होणार आता मोफत उपचार! काय म्हणाले टोपे?

या आजावरील औषध महागडे असून, त्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी असलेल्या १००० रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील.

106

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून, त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असून, म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

काय म्हणाले राजेश टोपे

कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि ज्यांचा मधुमेह नियंत्रित नाही त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे. नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका या आजारात आढळून येत असल्याचे टोपे यांनी सांगितले. या आजारावर लवकर उपचार नाही केले तर श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरित परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हे सांगतानाच या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे असल्याने त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

(हेही वाचाः कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी टास्क फोर्स!)

मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन

या आजावरील औषध महागडे असून, त्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी असलेल्या १००० रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असेही टोपे यांनी सांगितले. म्युकरमायकोसीस आजारावरील इंजेक्शन देखील चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून, त्याची किंमत निश्चित करुन त्यावर नियंत्रण आणले जाईल, असेही टोपे यांनी सांगितले. या आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरुन न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रित ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करुन घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.