आदित्य बोले, चहल डोले! २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक लसीकरण केंद्र!

मुंबईत १८ ते ४५ या वयोगटात अंदाजे ९० लाख नागरिक आहेत. या सर्वांसाठी २ डोस याप्रमाणे सुमारे १ कोटी ८० लाख डोस द्यावे लागणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या प्रत्येक नगरसेवकाकडून लसीकरण केंद्रासाठी मागणी होत असून त्याला परवानगी न देणाऱ्या महापालिका आयुक्तांनी आता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगताच मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यात वडाळा अॅक्वर्थ रुग्णालयातील लसीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी आदित्य ठाकरे यांनी अशाप्रकारची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनंतर तात्काळ आयुक्तांनी हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आदित्य बोले अन् चहल डोले असेच बोलले जात आहे.

१८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण नवीन खासगी केंद्रातच!

शनिवार, १ मे, २०२१ पासून निर्णायक टप्प्याचे लसीकरण सुरु होणार आहे. मुंबईत कार्यान्वित असलेल्या महानगरपालिकेच्या आणि शासकीय अशा एकूण ६३ केंद्रांवर सद्यस्थितीप्रमाणे ४५ वर्ष वयावरील नागरिकांचेच लसीकरण करण्यात येईल. नोंदणीकृत १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना तेथे लस दिली जाणार नाही. मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांमध्येच नोंदणीकृत १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जाहीर केला आहे. १ मे, २०२१ पासून सुरु होणाऱ्या  १८ वर्ष वयावरील नोंदणीकृत नागरिकांच्या कोविड लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी संदर्भात आयुक्त चहल यांनी व्हिडिओ कॉन्फरसीद्वारे मंगळवारी आढावा बैठक घेतली.

(हेही वाचा : माहिम,दादर आणि धारावीतली रुग्णसंख्या येतेय आटोक्यात!)

सुमारे १ कोटी ८० लाख डोस द्यावे लागणार!

मुंबईत १८ ते ४५ या वयोगटात अंदाजे ९० लाख नागरिक आहेत. या सर्वांसाठी २ डोस याप्रमाणे सुमारे १ कोटी ८० लाख डोस द्यावे लागणार आहेत. त्यामुळे या मोहिमेची व्यापकता पाहता, लस साठ्याची पुरेशी उपलब्धता, खरेदी, वाहतूक, वितरण त्यासोबत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे हे सर्व कळीचे मुद्दे आहेत. त्या संदर्भात महानगरपालिकेकडून सरकारकडे आणि लस उत्पादक कंपन्यांकडे देखील सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱया बैठकीत लसीकरण मोहिमेसंदर्भातील निर्णय झाल्यानंतर त्या अनुषंगाने महानगरपालिका पुढील कार्यवाही निश्चित करेल. असे असले तरी लसीकरणाची वाढती व्याप्ती पाहता नागरिकांची गर्दी होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये आणि संपूर्ण लसीकरण मोहिमेचे व्यवस्थापन योग्यरित्या व्हावे, म्हणून निर्णय घेण्यात आले आहेत, असे चहल यांनी नमूद केले. मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण २२७ लसीकरण केंद्र सुरु करण्यासाठी सर्व संबंधीत विभागीय सहाय्यक आयुक्तांनी कार्यवाही सुरु करावी. विभागातील आरोग्य केंद्र (हेल्थपोस्ट) हे प्रमाण मानून संबंधित परिसरातील नागरिकांसाठी असे लसीकरण केंद्र सुरु करावेत. पुरेशी जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी असे लसीकरण केंद्र सुरु करावेत. महानगरपालिकेच्या दवाखान्यांसह नजीकच्या खासगी रुग्णालयांना देखील त्या लसीकरण केंद्रांशी संलग्न करावे. जेणेकरुन, लसीकरणाचा प्रतिकूल परिणाम जाणवल्यास उपचार करणे सोईचे होईल.

मुंबईत आणखी २६ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र!

मुंबईत सध्या १३६ लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. त्यात शासन आणि महानगरपालिकेचे मिळून ६३ केंद्र आहेत, उर्वरित ७३ खासगी रुग्णालयातील केंद्र आहेत. आणखी २६ खासगी रुग्णालयांकडून मान्यतेसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील केंद्रांची संख्या आता ९९ इतकी होणार आहे.

१८ वर्षांवरील नागरीकांचे लसीकरण खासगी रुग्णालयातच!

१ मे पासून सुरु होणाऱ्या १८ वर्ष वयावरील नोंदणी केलेल्या नागरिकांचे लसीकरण लक्षात घेता मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रांवर १८ ते ४५ या वयोगटातील नोंदणीकृत नागरिकांना लस दिली जाईल. मुंबईतील शासकीय ६३ लसीकरण केंद्रांवर ४५ व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांनाच लस देण्यात येईल. १८ ते ४५ या वयोगटातील नोंदणी केलेल्या नागरिकांना तेथे लस दिली जाणार नाही. लसीकरण केंद्रांवर गर्दी टाळण्यासाठी, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून यारितीने विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लस साठ्याचा ओघ तसेच लसीकरण केंद्रांची संख्या वाढल्यानंतर मुंबईत दररोज किमान १ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, असे आयुक्त चहल यांनी अखेरीस नमूद केले. मुंबईतील गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस, विविध कंपन्या यांनी खासगी रुग्णालयांसमवेत ‘टायअप’ करुन आपल्या सदस्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा. लससाठा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागल्यानंतर पात्र सदस्यांचे प्रत्यक्ष लसीकरण करुन घ्यावे, असे महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here