अंधेरी पश्चिम येथील जुन्या सी.डी.बर्फीवाला रोड येथील ऑल इंडिया लोकल सेल्फ गर्व्हंमेंटपासून गुलमोहर रोडपर्यंत आणि न्यू इंडिया कॉलनीपर्यंत काही भाग आता पाणी तुंबण्याच्या शापातून मुक्त होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी तुंबणाऱ्या पाण्यावर आता पर्यायी पर्जन्य जलवाहिनीचा उतारा सापडला असून, लवकरच हे काम हाती घेण्यात येत असल्याने येत्या पावसाळ्यापर्यंत ते पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे जुहूतील नागरिकांना यावर्षी हा त्रास काही प्रमाणात सहन करावा लागणार असला तरी पुढील पावसाळ्यात पाणी तुंबण्याची ही समस्या कायमचीच हद्दपार होणार आहे.
अखेर उपाय शोधण्यात आला
जुहूमधील सी.डी.बर्फीवाला रोड तसेच गुलमोहर रोड आणि संतोषी माता मंदिर ते एन.एस.फडके रोडपर्यंतच्या उपसना लेन परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबले जात असल्याने स्थानिक रहिवाशांचे प्रचंड हाल होतात. तसेच या तुंबलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. पावसाळ्यात या ठिकाणच्या पाण्याचा निचरा करुन नागरिकांना दिलासा देण्याचा तात्पुरती प्रयत्न होत असला तरी वर्षानुवर्षांची ही समस्या आहे. त्यामुळे स्थानिक आमदार अमित साटम आणि तत्कालिन स्थानिक नगरसेविका सुधा सिंह यांच्या वारंवारच्या पाठपुराव्याने अखेर याचा अभ्यास करून या समस्येवर रामबाण उपाय शोधण्यात आला आहे.
जलवाहिन्यांचे बांधकाम केले जाणार
सी.डी. बर्फीवाला रस्त्याच्या पश्चिमेकडील बाजूस पावसाळी पाण्याचा निचरा करणारी वाहिनी अस्तित्वात नसल्याने या रस्त्यावरील सखल भाग असलेल्या न्यू इंडिया कॉलनी परिसरात पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे याठिकाणी रस्त्यालगतच्या पावसाळी जलवाहिन्यांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच उपसना लेनवरील पावसाळी जलवाहिनीची रुंदी व खोली अपुरी असल्याने पावसाळ्यात पाणी योग्य प्रकारे वाहून जात नाही. त्यामुळे या पर्जन्य जलवाहिनींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून या ठिकाणी पावसाळी पाण्याचा निचरा जलदगतीने होऊन पाणी साचण्याच्या प्रकाराला आळा बसेल.
( हेही वाचा:भारत-नेपाळ रेल्वेचे काय आहे कोकण रेल्वे कनेक्शन? )
सहा महिन्यांत काम होणे अपेक्षित
यासाठी महापालिकेने कंत्राटदाराची निवड केली असून सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून हे काम केले जाणार आहे. या कामासाठी डी.आर.शाह कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीने महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा उणे २७ टक्के दराने हे काम मिळवले आहे. ९६५ मीटर लांबीच्या सिमेंट काँक्रिटचे बांधकाम केले जाणार असून हे काम पुढील सहा महिन्यांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community