राज्यात जुलै-ऑगस्टमध्ये तिसरी लाट येणार!

जुलै महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राज्य आॅक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण होईल, असा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला.

65

राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट असून, दुसऱ्या लाटेत राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता  जुलै, ऑगस्ट दरम्यान राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येऊ शकते, असा साथरोग तज्ज्ञांचा अंदाज असून त्यापूर्वी आॅक्सिजमध्ये राज्य स्वयंपूर्ण करण्याची शासनाने तयारी चालवल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी, २९ एप्रिल रोजी सायंकाळी कोविड उपाययोजनेसंदर्भात दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठक घेतली. त्यानंतर टोपे पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले टोपे?

राज्यातील प्रत्येक तालुक्यात आॅक्सिजनचे आपण प्रकल्प उभे करत आहोत. आॅक्सिजनचा तुटवडा जाणवू नये यासंदर्भात आवश्यक उपकरणे व यंत्रे खरेदी करण्यात येत आहेत. जुलै महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी राज्य आॅक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली. सध्या केवळ ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण चालू आहे. त्यासाठीची लस केंद्र सरकार पुरवत आहे. ४५ वयाखालील नागरिकांसाठी राज्याला लस मिळवण्यात अनेक अडचणी येत आहेत. लसीची उपलब्धता देशात नाही.

(हेही वाचा : शुक्रवारपासून तीन दिवस मुंबईतील लसीकरण बंद!)

मे अखेरपर्यंत कोरोनाची दुसरी लाट संपेल!

कमी लस पुरवठ्यामुळे गर्दी, गाेंधळ होऊ शकतो. म्हणून किमान २५ लाख लस मात्रा राज्याला प्राप्त झाल्याशिवाय आपण १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा प्रारंभ करणार नाही. त्यामुळे किमान १५ मेपर्यंत तरी या गटातील नागरिकांना लस टोचणे शक्य नाही, अशी माहिती टोपे यांनी दिली. भारत बायोटेकने त्यांच्या कोव्हॅक्सीनचा दर प्रती मात्रा २०० रुपयांनी घटवला आहे. सीरमने यापूर्वी त्यांच्या कोविशील्डचा दर १०० रुपयांनी कमी केला आहे. राज्याला देण्यात येणाऱ्या लसीचे दर कमी झाल्याने राज्यावर पडणारा आर्थिक बोजा काहीप्रमाणात कमी झाला असून हा मोठा दिलासा असल्याचे टोपे म्हणाले. मे अखेरपर्यंत राज्यातील कोरोनाची दुसरी लाट सपाट झालेली असेल असे सांगितले जात आहे. मात्र त्यानंतर लगेच एक दीड महिन्यात कोरानाची तिसरी लाट येण्याच्या अंदाजाने राज्यासमोरील अडचणी वाढणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.