मुंबई महानगरपालिकेच्या ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय’ मधील पक्ष्यांचे नंदनवन शनिवारपासून लोकांसाठी खुले केले जाणार आहे. या पक्ष्यांच्या नंदनवनात प्रामुख्याने धनेश, पोपट, सोनेरी तितर, मोर, कोकॅटिल, मिलिटरी मकाऊ, आफ्रिकन करडा पोपट आदींचा समावेश आहे. पक्ष्यांच्या नंदनवनासह माकडाचेही दर्शन शनिवारपासून होणार आहे. पक्ष्यांसह माकडांच्या प्रदर्शनी पिंजऱ्यांचे लोकार्पणही शनिवारी होणार आहे. यासह अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ‘बायोम थीम’वर आधारित उद्यान आणि सांडपाणी पुनर्वापर प्रक्रिया संयंत्र यांचेही लोकार्पण शनिवारी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
( हेही वाचा : बेस्टच्या कार्डने आता करा मेट्रो-रेल्वे प्रवास! हे कार्ड कुठे मिळणार, किंमत किती? )
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या बृहत् (मांडणी) आराखड्यामध्ये दोन नवीन भूखंडांचा समावेश करुन व इतर सुधारणांसह सुधारित बृहत् (मांडणी) आराखड्यास केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (नवी दिल्ली) यांची अंतिम मंजुरी प्राप्त झाली होती. त्यानुसार महानगरपालिकेने या उद्यानामध्ये विविध लोकोपयोगी मनोरंजनाची साधने विकसित केली आहेत. त्यानुसार ही विकासकामे पूर्ण करण्यात आली आहे.
पक्ष्यांचे नंदनवन
राणीबागेत नव्याने पक्ष्यांचे नंदनवन बनवण्यात आले आहे. या नंदनवनात वॉक थ्रू सुविधेसह तयार करण्यात आलेली प्रदर्शनी अत्यंत भव्य आहे. काचेच्या प्रदर्शन गॅलरीमधून आतील तयार करण्यात आलेले नैसर्गिक अधिवास, पक्ष्यांकरिता विविध झाडे-झुडुपे, घरटी तयार करण्याच्या जागा, खेळणी, पाणी पिण्याच्या सुविधा इत्यादी पाहता येतात. युरोपियन तंत्रज्ञानावर आधारित स्टेनलेस स्टील वायरमेशची संरचना प्रदर्शनीच्या आच्छादनासाठी उभारण्यात आली आहे. या प्रदर्शनीमध्ये प्रामुख्याने धनेश, पोपट, सोनेरी तितर, मोर, कोकॅटिल, मिलिटरी मकाऊ, आफ्रिकन करडा पोपट आदी पाणपक्षी प्रदर्शित करण्यात आले आहेत. पक्ष्यांविषयीची रंजक आणि जीवशास्त्रीय माहिती देणाऱ्या बाबी समाविष्ट असलेले फलक प्रदर्शनीमध्ये लावण्यात आले आहेत.
माकड पाहण्यास मिळतील
माकडांकरिता तयार करण्यात आलेले आवासस्थान अत्यंत भव्य आहे. प्रदर्शन गॅलरीमधून आतील भागात तयार करण्यात आलेले कृत्रिम निवास, आकर्षक संरचना, झोपाळे इत्यादी सुविधांचा आनंद घेताना माकडे पाहण्यास मिळतील.
बायोम थीम आधारित उद्याने
विविध प्रकारच्या हवामान क्षेत्रांमध्ये उगवणाऱ्या वनस्पती संस्थावर आधारित उद्यान, ज्यापैकी या प्राणिसंग्रहालयामध्ये खालील प्रकारच्या परिसंस्था तयार करण्यात आल्या आहेत.
उष्णकटिबंधीय परिसंस्था
उष्णकटिबंधीय परिसंस्था गरम, दाट झाडीमुळे ओळखल्या जातात. या परिसंस्था भारतात पश्चिम घाटात आढळतात. पाऊस जास्त असल्यामुळे झाडे मुसळधार पावसाशी जुळवून घेतात. झाडे सदाहरित असून त्यांना निमुळती, जाड, मेणासारखी पाने असतात.
Join Our WhatsApp Community