-
प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाच्या दुरुस्ती आणि सुधारणा कामांसाठी तब्बल ६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या मागणीसाठी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. जलसंपदा विभागाने या निधीसाठीचा शासन आदेश नुकताच जारी केला आहे.
पणदेरी धरणामध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे तसेच धरणाचा सांडवा फुटल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरत नव्हते. परिणामी, पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी या धरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांकडून सतत तक्रारी होत होत्या.
(हेही वाचा – Mohammed Siraj : ‘चॅम्पियन्स करंडकासाठी संघातून वगळणं पचायला कठीण गेलं,’ – मोहम्मद सिराज)
या तक्रारींचा गांभीर्याने विचार करत राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे धरणाच्या दुरुस्ती आणि गाळ काढणीसाठी निधीची मागणी केली होती. त्यांच्या प्रस्तावावर कार्यवाही करत जलसंपदा विभागाने ३ एप्रिल २०२५ रोजी ६० कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
या धरणामुळे घोसाळे, पणदेरी, बहिरवली, कोंडगाव आणि दंडनगरी या गावांना मोठा फायदा होणार आहे. दुरुस्तीनंतर या भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळेल. विशेषतः भातशेती तसेच आंबा, सुपारी, काजू यांसारख्या फळपिकांसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे. शिवाय, स्थानिक नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे.
(हेही वाचा – Kiran Mane यांच्याकडून मराठी नाट्य संस्कृतीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न; नेटकऱ्यांनी चांगलेच झोडपले)
सन १९९५-९६ मध्ये पूर्ण झालेले पणदेरी धरण मागील काही वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होते. गाळ साचल्याने आणि सांडवा निकामी झाल्याने धरण रिकामे करावे लागले होते. त्यानंतर काही तात्पुरती कामे झाली असली तरी संपूर्ण दुरुस्ती होणे आवश्यक होते. निधी मंजूर झाल्यानंतर लवकरच प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या प्रयत्नामुळे हा रखडलेला प्रकल्प मार्गी लागल्याने तालुक्यात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण असून, स्थानिक शेतकरी, महिला आणि व्यापाऱ्यांनी मंत्री कदम यांचे आभार मानले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community