दहावीच्या निकालाचे दिव्य पार पाडल्यानंतर आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला अकरावीच्या प्रवेशाची ‘परीक्षा’ द्यावी लागणार आहे. सोमवारी, १९ जुलैपासून सीईटी परीक्षेसाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे. २१ ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सीईटी परीक्षा ऐच्छिक असेल असे घोषित केले आहे. मात्र मुंबईतील बहुतांश महाविद्यालयांनी सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीईटी परीक्षेवरून शालेय शिक्षण मंत्री आणि महाविद्यालये यांच्यात विरोधाभास जाणवत आहे.
परीक्षा ऑफलाईन होणार!
ज्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा द्यायची आहे, त्या विद्यार्थ्यांना १९ जुलैपासून अर्ज भरता येणार आहे. येत्या दोन दिवसांत परीक्षेची नियमावली जाहीर होणार आहे. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षेसाठी स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे. सीईटीसाठी वेगळा अभ्यासक्रम असणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मात्र ही सीईटी न देताही अकरावीचे प्रवेश घेता येणार आहेत. या परीक्षेत इंग्रजी, गणित, समाजशास्त्र, विज्ञान विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
(हेही वाचा : यंदाचा दहावीचा निकाल ९९.९५ टक्के!)
मुंबईतील महाविद्यालयांचा निकालावर नाही विश्वास!
दहावीचा निकाल यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे शाळांनीच तयार केला आहे. त्यामुळे यंदाचा निकाल न भूतो न भविष्यति असा ९९.९५ टक्के निकाल लागला आहे. दहावीच्या १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यातील ७५ ते ९० टक्के गुण मिळालेले ६ लाख ४८ हजार ६८३ विद्यार्थी आहेत. याचा स्पष्ट अर्थ निघतो कि यावेळी मिळालेल्या चांगल्या गुणांच्या आधारे अनेक विद्यार्थी मुंबईतील चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न करणार आहेत. मात्र मुंबईतील महाविद्यालये या निकालावर विश्वास ठेवून प्रवेश देण्याच्या मनस्थितीत नाहीत. अकरावीत प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सीईटी परीक्षेतील गुणांच्या आधारे त्यांची गुणवत्ता पडताळून मुंबईतील महाविद्यालये प्रवेश देणार आहेत. सुरुवातीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी सीईटी सक्ती करण्याचा निर्णय महाविद्यालयांनी घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी तरी परीक्षा द्यावी लागणार आहे.
महाविद्यालये सुरु व्हायला ऑक्टोबर उजाडणार!
दरम्यान २१ ऑगस्ट रोजी सीईटी परीक्षा होणार आहे. त्यानंतर निकाल लागून प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्यास सप्टेंबर महिना जाऊन ऑक्टोबर उजाडणार आहे. याचा अर्थ अकरावीच्या शैक्षणिक वर्षातील ३ महिने वाया जाणार आहे, अशा वेळी विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम देणार कि अर्धा अभ्यासक्रम देणार याचा निर्णय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला घ्यावा लागणार आहे.
Join Our WhatsApp Community