सुशोभिकरणाच्या कामांचा वेग कायम राखा, पण कामांची पुनरावृत्ती नको

111

जी – २० परिषदेच्या मुंबईतील पहिल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने नागरी सेवा-सुविधांची कामे व सुशोभीकरण अत्यंत वेगाने केले, त्याबद्दल नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जी – २० मधील भारताचे शेरपा अमिताभ कांत यांनी मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले आहे. हीच धडाडी व वेग कायम ठेऊन आता सर्व उपक्रमांमध्ये निश्चित केलेले लक्ष्य गाठावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत.

महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेला मुंबई सुशोभीकरण प्रकल्प, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना योजना, प्रधानमंत्री स्व-निधी योजना, माझी मुंबई – स्वच्छ मुंबई मोहीम आदींचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्यासमवेत सर्व सह आयुक्त, परिमंडळांचे उप आयुक्त, संबंधित खात्यांचे सह आयुक्त तथा उप आयुक्त, सर्व सहायक आयुक्त आणि संबंधित खाते प्रमुख यांची शुक्रवारी १६ डिसेंबर २०२२ रोजी ऑनलाईन कॉन्फरन्सीद्वारे आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

जी – २० परिषदेच्या पहिल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या कामकाजाचे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी कौतुक केले आहे. मुंबईत आगामी काळात आणखी ७ बैठका होणार आहेत. ही बाब लक्षात घेता, जे साहित्य पुन्हा वापरात येऊ शकते, ते व्यवस्थितपणे जतन करुन ठेवावे. जेणेकरुन, खर्चाची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पुढील २ ते ३ दिवसांत सर्व साहित्य परत आणून जतन करावे.

मुंबई सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत होत असलेल्या कामांच्या अंमलबजावणीचा विभाग कार्यालय स्तरावर दर आठवड्याला तर परिमंडळ स्तरावर दर पंधरवड्याला आढावा घ्यावा. तसेच सर्व २४ विभाग कार्यालय आणि संबंधित खात्यांच्या स्तरावर देखील दक्षता समिती नेमावी. या समित्यांनी प्रामुख्याने सुशोभीकरण अंतर्गत होणाऱ्या कामांची प्रगती व गुणवत्तेवर लक्ष ठेवावे. तसेच कोणत्याही स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्यास तातडीने त्याचे निराकरण करावे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.