गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli Accident) घोट-मुलचेरा महामार्गावर एका धावत्या बसने अचानक पेट घेतला. बसचालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बस थांबवून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. ही खळबळजनक घटना १ मार्चला सकाळी गडचिरोलीतील मुलचेरा ते घोट रस्त्यावरील जंगलात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली आगाराची एम.एच. ०७ सी-९३१६ ही बस मुलचेरा तालुका मुख्यालयात दररोज रात्री मुक्कामी असते. ही बस दररोज पहाटे ५च्या सुमारास मुलचेरावरून घोट-चामोर्शी-भाडभिडीमार्गे गडचिरोलीला जाते. शुक्रवारी सकाळी सकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे या बसमधून प्रवाशांचा प्रवास सुरू झाला असता मुलचेरा ते घोट रस्त्यावर आल्यावर बसने अचानक पेट घेतला. बसचालकाच्या ही गोष्ट लक्षात आली. एसटीने पेट घेतलेला बघून प्रवाशांची भीतीने तारांबळ उडाली. प्रवाशांचा भीतीने थरकाप उडाला. प्रसंगावधान राखत बसचालकाने वेळीच बस थांबवून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यात जवळपास ८ प्रवासी आणि चालक-वाहक होते. सर्वजण अपघातात थोडक्यात बचावले. एसटी बसच्या इंजिनमधून धूर निघाल्याने बसच्या बॅटरीमध्ये शॉर्टसर्कीटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
(हेही वाचा – Aus Vs NZ Test Record : कॅमेरून ग्रीन आणि हेझलवूड यांची दहाव्या गड्यासाठी विक्रमी भागिदारी)
बसचालक प्रदीप मडावी आणि वाहक लोकेश भांडेकर यांनी प्रसंगावधान साधून सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवले आणि स्वत:ही इतर प्रवाशांचे सामान घेऊन खाली उतरले. त्यानंतर लगेचच बसने पेट घेतला. बसमध्ये प्रवासी घाबरले. त्यामुळे ते जंगलात दूर जाऊन उभे राहिले. चालक आणि वाहकाने झाडांच्या फांद्या हातात घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
नवीन बसेसची प्रवाशांकडून मागणी…
राज्यात आणि विशेषत: गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात दिवसेंदिवस एसटी महामंडळाच्या बसेसची दुरावस्था झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढतअसल्याचे चित्र समोर येत आहे. काही बसेसचे छत निघालेले आहे. कधी एका हातात स्टेरिंग आणि एका हातात वायपर पकडून बसचालकाला बस चालावावी लागते. बसेसच्या दुरावस्थेमुळे प्रवासी, चालक आणि वाहकाच्या जीवाला धोका निर्माण होऊन अपघाताची शक्यता बळावत आहे. प्रत्यक्ष बस कधी आगारात दाखल होतील याची सर्वच जण वाट पाहात आहेत. या दुर्घटनेमुळे जिल्ह्यातील सर्व बसेस लवकरात लवकर बदलून नवीन बसेस आणाव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत. जिल्ह्यात ४० बसेस मंजूर झालेल्या असतानाही त्या एसटी महामंडळाला देण्यात आलेल्या नाहीत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community