खळबळजनक! १९ मुलांचा मृत्यू, ‘या’ कफ सिरपपासून रहा सावधान

उज्बेकिस्थान येथे भयानक प्रकार घडला आहे. खोकल्याच्या औषधाने निष्पाप बालकांचा जीव घेतला आणि यामुळे एकच हाहाकार माजला. नोएडाची कंपनी फार्मा मॅरियन बायोटेक आता वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या प्रकरणानंतर डब्ल्यूएचओने सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की नोएडाची कंपनी मॅरियन बायोटेकने बनवलेले दोन कफ सिरप घेऊ नये. या औषधामुळे उज्बेकिस्थान येथे १९ मुलांचा मृत्यू झाला म्हणून या कफ सिरपचा वापर लहान मुलांवर मुळीच करु नये. लहान मुलांसाठी हे औषध अत्यंत धोकादायक आहे.

( हेही वाचा : मालिका जिंकल्यावर विराट-ईशान थिरकले; डान्सचा व्हिडिओ व्हायरल!)

AMBRONOL सिरप आणि DOK-1 मॅक्स सिरप या दोन औषधांसाठी डब्ल्यूएचओने सावधानतेचा इशारा दिला आहे. गंभीर बाब म्हणजे तपासणी केल्यावर दोन्ही सिरपमध्ये डायथिलीन ग्लाइकोलचे अस्वीकारण्यायोग्य प्रमाण आढळून आले. त्यामुळे या औषधांवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान उज्बेकिस्थानने असा दावा केला आहे की, या भारतीय कंपन्यांचे औषध घेतल्यामुळे लहान मुलांना जीव गमवावा लागला आहे.

संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य एजेंसीने असं म्हटलं आहे की हे औषध असुरक्षित तर आहेत, परंतु खासकरुन लहान मुलांसाठी अतिशय घातक आहे. या औषधाचं सेवन केल्यामुळे लहान मुलांच्या जीवावर बेतू शकतं. इतर देशात देखील या उत्पदानाची वितरण व्यवस्था असू शकते. त्यामुळे इतर देशांनीही याबाबत काळजी घेणे गरजेचे आहेत. दरम्यान डब्ल्यूएचओने सावधगिरीचा इशारा दिल्यानंतर उत्तर प्रदेशच्या अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने उज्बेकिस्थानमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मॅरियन बायोटेक कंपनीचा उत्पादन परवाना रद्द केला आहे.

त्यामुळे बाजारात जर हे औषध विक्रीसाठी उपलब्ध असेल किंवा अनैतिक पद्धतीने दिलं जात असेल तर त्वरित त्याबद्दल तक्रार केली पाहिजे आणि या औषधाचं सेवन मुळीच होता कामा नये. सध्या वातावरण खराब असल्यामुळे अनेकांना सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामुळे कफ सिरपची विक्री देखील वाढत आहे, या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here