तयार गणेश मूर्ती विकणाऱ्या व्यावसायिकांना मंडपासाठी परवानगी नाही!

तयार गणेश मूर्ती विकणारे व्यवसाय करतात, तर मूर्ती घडवणारा मूर्तिकार हा कला जोपासत असतो. त्यामुळे मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांच्या कलेचा आदर राखत तयार मूर्ती आणून त्याची विक्री करणाऱ्यांवर बंदी घालावी, अशी मागणी आधीपासून होत होती.

151

गणेश मूर्तिकारांची मागील अनेक वर्षांची मागणी महापालिकेने मान्य केली आहे. यावर्षी खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा मूर्तिकारांना पावला आहे. कारण या वर्षापासून गणेश मूर्ती बनवणाऱ्या मुर्तिकारांना मंडप उभारुन मूर्ती विकण्यास परवानगी दिली जाणार आहे. तयार मूर्ती आणून त्याची विक्री करणाऱ्या मूर्तिकारांना यावर्षी मंडप उभारण्यास महापालिकेच्यावतीने परवानगी दिली जाणार नाही.

फक्त मूर्ती विक्रीसाठी मंडपाला परवानगी नाही!

गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवावेळी मूर्ती तयार करुन विक्री करणाऱ्या मूर्तिकारांना तात्पुरत्या स्वरुपाचे मंडप बांधण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातून परवानगी देण्यात येते. या परवानग्या मागील वर्षाप्रमाणेच या वर्षीही ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणार आहेत. या पद्धतीने देण्यात येणा-या परवानग्या स्वतः मूर्ती तयार करुन विक्री करणा-या मूर्तिकारांनाच देण्यात येतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच तयार मूर्ती बाहेरुन आणून फक्त विक्रीसाठी मंडप बांधण्याची परवानगी मान्य करण्यात येणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

(हेही वाचा : आरोग्याच्या खांद्यावर निवडणुकीचा भार!)

मागणी आधीपासून होती!

मुंबईतील गणेश मूर्तिकार संघटनेची तसेच बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीची अशाप्रकारची कायमच मागणी राहिलेली आहे. तयार मूर्ती विकणारे व्यवसाय करतात तर मूर्ती घडवणारा मूर्तिकार हा कला जोपासत असतो. त्यामुळे मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांच्या कलेचा आदर राखत तयार मूर्ती आणून त्याची विक्री करणाऱ्यांवर बंदी घालावी किंबहुना त्यांना मंडप उभारण्यास परवानगी देवू नये, अशी मागणी हेात होती. मूर्तिकारांना मंडपाकरीता परवानगी देण्यासाठी सन २०२१ करीता लागू असलेल्या विविध स्तरीय शुल्काबाबतचे परिपत्रक महापालिकेच्या सर्व म्हणजे २४ विभाग कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच हे परिपत्रक मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. याची लिंक पुढीलप्रमाणे आहेः

https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlCircuis

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.