कृत्रिम तलावांकडे वळू लागले भाविक! दीड दिवसांच्या इतक्या मूर्तींचे विसर्जन

139

श्री. गणरायांचे आगमन शुक्रवारी घरोघरी आणि सार्वजनिक उत्सव मंडळांमध्ये झाल्यानंतर शनिवारी दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला आहे. शनिवारी दुपारपासून सुरू झालेल्या या विसर्जन सोहळ्यात रात्री उशिरापर्यंत बाप्पांना निरोप देण्यात येत होता. संपूर्ण दिवसभरात दीड दिवसांच्या एकूण ४० हजार ८६४ घरगुती आणि ३९९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत कृत्रिम तलावांमधील गणेशमूर्तींच्या संख्येत दोन हजारांनी वाढ दिसून येत आहे.

कृत्रिम तलावांची निर्मिती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नैसर्गिक गणेश विसर्जन स्थळे असलेल्या समुद्र चौपाटी व तलावांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून कृत्रिम तलावांच्या निर्मितीवर अधिक भर दिला. प्रत्येक विभागांमध्ये कृत्रिम तलावांची निर्मिती करुन एकूण १७३ तलावे गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करुन दिली. याशिवाय फिरत्या कृत्रिम तलावांचीही निर्मिती करण्यात आली.

(हेही वाचाः ‘लालबागचा राजा’च्या दरबारी पोलिसांची पत्रकारांवर दंडुकेशाही! )

इतक्या मूर्तींचे विसर्जन

शनिवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या गणेश मूर्ती विसर्जन सोहळ्यात दीड दिवसांच्या ३९५ सार्वजनिक गणेशमूर्ती आणि ४० हजार ८६४ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले. १८ हरतालिका मिळून अशाप्रकारे एकूण ४१ हजार २७७ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये महापालिकेच्या १७३ कृत्रिम तलावांमध्ये सार्वजनिक मंडळांच्या २८३ आणि घरगुती २४ हजार २६९ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. २०१९ मध्ये केवळ ३४ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळी १४ हजार ४९० दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडले होते. तर मागील वर्षी १६७ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी २२ हजार ८५९ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते. यावर्षी २४ हजार २६९ गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये झाले आहे.

पर्यावरणपूरक विसर्जन

मुंबईत २०१९मध्ये कृत्रिम तलावांच्या निर्मितीकडे लक्ष न देणाऱ्या महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावांची निर्मिती केली. त्यामुळे मागील गणेशोत्सवामध्ये १६७ कृत्रिम तलावांची निर्मिती करणाऱ्या प्रशासनाने यंदा पुन्हा त्यात वाढ करत एकूण १७३ तलावांची निर्मिती केली. पर्यावरणपूरक अशा कृत्रिम तलावांकडे जाण्याची भाविकांची इच्छा नसली, तरी कोरेानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून भाविक आता कृत्रिम तलावांकडे वळू लागले आहेत. समुद्रकिनारी आणि नैसर्गिक तलावांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, म्हणून कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली. असे असले तरी दीड दिवसांच्या २४ हजार २६९ गणेशमूर्तींचे विसर्जन याठिकाणी झाले. तर उर्वरित १७ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन ७० नैसर्गिक विसर्जन ठिकाणी झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

(हेही वाचाः यंदा मुंबईतील ३८१ मंडळांकडे गणपती आलाच नाही!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.